एक संध्या

शर्वरीने ने रिक्षाला हात दिला, पण एक रिक्षा थांबेन तर शप्पथ, सगळ्या जश्या भरलेली बदली भरून वाहावी तश्या तुडुंब भरून येत होत्या आणि तिला वाकुल्या दाखवत निघून जात होत्या. आता मात्रा ती पुरती वैतागली. एक तर असं  हे आडोश्याच गाव, त्यातच संध्याकाळचे चार वाजत आलेले, हिवाळ्याचे दिवस, थोड्याच वेळात अंधार पडेल आणि मधे थोडं छोटं जंगलच होतं , सुनसान  रस्ता. तीन चार वळणं  घेतली की लगेच मुख्य गावाचे दिवे दिसायला लागायचे पण तिथेपर्यंत पोहचण्यासाठीच रिक्षा, बस काहीही मिळत नव्हतं. लवकर जायची सोय नाही झाली तर चांगलीच पंचाईत होईल.

शर्वरी विचार करू लागली, काय बरं करता येईल. तश्या ह्या गावातून जाणार्‍या बर्‍याच चार चाक्या तिने पहिल्या होत्या, एक दोघांनी तिला जायचं का म्हणून विचारलही  होतं पण अश्या अनोळखी गाडीत कसं जायचं, तिचा संकोच आड आला. परत सौरभचे शब्द आठवले, काहीही झालं तरी पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करायचा, तेच जास्त भरवश्याच असतं. तिला असं काम करायला परवानगी देतानाच तो म्हणाला होता. तसा ती तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र होती आणि त्याच्या हुकूमात  राहायला अजुन ती त्याची बायकोही नव्हती पण तिलाच आपलं वाटे कुठलाही निर्णय घेताना तो दोघांचा  असावा, दोघांच्या मर्जीने सगळ्या गोष्टी झाल्या तर आयुष्य सुरळीत चालतं आणि भविष्यातल्या छोट्यामोठ्या कुरबुरी टळतात. नाही तरी अजुन महिनाभरात त्यांचे लग्न होणार होतेच मग आताच एकमेकांचे कामाचे स्वरुप समजले तर उत्तमच होते. त्यानी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यात, त्याच्या मनप्रमाणे वागण्यात, त्याचे हट्ट पुरवण्यात तिला त्याचं प्रेमच दिसे. खरच किती प्रेम करतो सौरभ आपल्यावर, आता फोन करावा का त्याला, त्याला म्हणावं तूच येऊन घेऊन चल मला, मस्त रानावानातून उंडारत जाऊ, सावल्यांशी खेळ खेळत, चिंचा बोरे वेचत, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत एका गाडीवर लगटून बसत, ह्या संध्येचा आस्वाद घेऊ. उत्साहाने तिने पर्समधून मोबाइल काढला, घाई घाईने लास्ट डाइयल्ड नंबर लावला, त्याचाच होता तो, थोडा वेळ रिंग गेली पण छे!!!!!!  एकदा रिंग गेल्यावर फोन उचलेल तो सौरभ कसला. जेव्हा पाहावं  तेव्हा कामात बुडलेला असतो. आताच  हे हाल आहेत तर लग्नानंतर काय होईल देवच जाणे…

तितक्यात एक गाडी तिच्या जवळ येऊन थांबली, गाडी कसली डुककर ऑटोच तो. संध्याकाळ होत आलेली त्यामुळे गावातून बाहेर जाणार्यांपेक्षा येणार्यांचीच संख्या जास्त होती. तिने क्षण दोन क्षण विचार केला, एकदा हातातील घडळ्यटवार नजर टाकली, साडे चार होत आले होते. सौरभचाही फोन लागत नव्हता आणि इथून जायला पाऊन-एक तास नक्कीच लागला असता. तिने गाडीत नजर टाकली, चार लोकं अजुन होते तीन बायका आणि एक माणूस या शिवाय ड्राइवर. जायला काहीच हरकत नव्हती अजुन वाट पाहण्यात अर्थ  नव्हता. ती गाडीत बसली.

सवयीप्रमाणे तिने आतील लोकांचे निरीक्षण केले, तिघी बायका म्हणजे एक 15-16 वर्षाची मुलगी, तिची आई आणि आजी अश्या होत्या. ह्या लोकात लग्न लवकर होतात त्यामुळे त्या मुलीची आई पण 33-34 वर्षाचीच  होती. ह्या लोकांमधे कितीही जन जागृती केली तरी काही हे लोकं लवकर सुधरत नाही तिच्या मनात येऊन गेले. आता आपण इथे तरी आज कशाला आलो, इथल्या शाळेतील मुलांना संगणकाविषयी थोडी माहिती द्यायची होती त्यासाठीच. शाळेने यायची जायची सोय करू असे सांगितलेही होते पण वेळेवर दुसर्याच एका कार्यक्रमासाठी गाडी गेल्याने आपलं आपल्यालाच यावं लागलं  बरं परतायला इतका उशीर होईल असही वाटलं नव्हतं. फार तर दोन पर्यंत इथून परत निघू आणि चार वाजे पर्यंत घरी पोहोचलं की मस्त आईच्या हातचा चहा घेत TV पहात, मधे मधे सौरभला ऑफिसात फोन करून डिस्टर्ब करत वेळ घालवायचा असं ठरवलं पण होतं पण इथून निघायलाच हा उशीर. मधेच लोड शेडिंग त्यामुळे थांबवच लागलं, बरं आज न करावं तर पुन्हा इकडे यावच लागणार त्यापेक्षा थोडा उशीर झालेला बरा.

तिचं लक्ष परत गाडितल्या माणसांकडे गेले. तो जो चौथा माणूस होता तो काही त्या तिघी बायकांसोबत आहे असं वाटत नव्हतं. थोडा राकट, मिशीवाला, काळा सावळा असा गावातील माणूस होता तो. तिचे ड्राइवर कडे लक्ष गेले, गाडीच्या आरशात त्याच चेहरा स्पष्ट दिसत होता, त्याची आणि ह्या मागच्या माणसाची ओळख आहे असेच वाटले तिला, त्यांचे नजरेने काही इशारे पण चालू होते. अर्धा रस्ता पार झला, तिथे एक छोटेसे गाव होते आठ-दहा झोपड्यांचे. आता पुढे त्या छोट्याश्या रानातली तीन चार वळणं झाली की मुख्य गावाचे दिवेच दिसणार. चला एकदाचं पोहचत आलो आपण, शर्वरीने मनात हुश्य केलं, पण हाय राम !!!!!!!!!

त्याच वेळी गाडी थांबली आणि त्या तिघी जणी तिथे उतरल्या. अरे देवा ह्यानाही इथेच उतरायचं होतं. शर्वरीची अवस्था आता सश्यासारखी झाली, एकटा भित्रा ससा. इथे मधे ती आता उतरूही शकत नव्हती. गाडीत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अंग चोरून एका कोपर्‍यात बसली ती. काही तरी मनात येऊन तिने परत सौरभ ला फोन लावला पण छे परत एकदा ओरडून तो बंद झाला. मनातल्या मनात फार राग आला तिला सौरभचा. कुणी एखादी बाई अजुन गाडीत चढली तर बरं होईल तिला वाटलं. पण संध्याकाळच्या वेळेस त्या बाजूला कुणीही नव्हतं. त्या तिघी फक्त जाताना दिसत होत्या. गाडीवाला पण न थांबता  लगेच निघाला वाघ मागे लागल्यासारखा, ह्याला कसली एव्हडी घाई आलीय कुणास ठाऊक…

शर्वरी जीव मुठीत धरून बसली होती. तसं पहिले तर घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. पण ह्या सुनसान  रस्त्यावर आपण एकट्याच ह्या दोन गावातील माणसांसोबत ह्या गाडीतून जातोय ह्याचीच शर्वरीला जास्त भीती वाटत होती. रानातल्या जानावरांपेक्षा माणसातले पशुच जास्त धोकादायक असतात.  न जाणो ह्यानी गाडी वाटेत मधेच थांबवून मला ह्या रानात नेलं तर……ह्या विचारसरशी ती दचकलीच. हा मागे बसलेला माणूस नजरेनेच ड्राइवरला परत काही तरी सांगतोय असं वाटलं तिला. परत एकदा घड्याळात नजर टाकली तिने, 5 वाजत आले होते पण आधीच हिवाळा आणि त्यात दोन्ही बाजूने गडद झाडी त्यामुळे बराच अंधार झाला  होता. संध्याकाळचे साडे सहा वाजल्यासारखे वाटत होते. फट-फट आवाज करत त्या रानातल्या शांततेचा भंग  करत गाडी चालली होती.  गाडीचा आवाज हळूहळू कमी कमी होत आचनक बंद झाला आणि गाडी ढिम्म एका जागेवर…….. अरे बापरे !!!!!!!!!!!!!

आता तर शर्वरी कमालीची घाबरली, आता काही खैर नाही, आपली भीती खरी ठरते की काय आणि ह्या आड रानात आपण ओरडलो तरी कुणाला ऐकूही जाणार नाही. मागचा माणूस खाली उतरला. ड्राइवर ने आणि त्याने काही तरी कुजबुज केली आणि तो तिच्या दिशेने चालू लागला. शर्वरी आहे त्या जागीच अजुन मागे सरकली. आता तर मागे सरकायलाही जागा नव्हती. तो अजुन तिच्या जवळ आला आणि शुद्ध मराठीत पण थोड्या गावकी ढंगात म्हणाला

“पेट्रोल संपलय गाडीतलं. पेट्रोल पंप वजून दूर हाय. थांबावं लागल थोडं.”

ड्राइवर गाडी चालू करायचा प्रयत्न करत होता. शर्वरीला थोडे बरे वाटले, त्यातल्या त्यात तिला वाटत असलेली भीती थोडी कमी झाली तरी अजुन गावात पोहचेपर्यंत जीवात जीव राहणार नव्हता. आता ह्या रानात पेट्रोल कुठून आणणार, दुसरी एखादी गाडीही नाही आणि ह्या गावातल्या लोकांचा काय भरवसा. आता तर थोड्याच वेळात गडद अंधार पडेल. सौरभ म्हणतो तेच खरं विनाकारण आपण ह्या नसत्या भानगडीत अडकतो, आता इथे येणं  रद्द करणं पण आपल्याच हातात होतं आणि कोणी सोबत नसेल तर नको जाऊ असं सौरभ म्हणालाही होता पण नाही आपल्यालाच समाजसेवेची खाज. तिने आपली कॉटन ची ओढणी अधिकच घट्टा लपेटून घेतली.

तचे लक्ष  त्या दोघांकडे गेले ते परत आपापसात काही तरी कुजबुजत होते. तिला उगाचच त्यांचा संशय आला, न जाणो आपल्या बद्दलच बोलत असतील. तो मागचा माणूस तिला जरा गुंडच वाटत होता, त्याचे हावभाव पण तिला खटकत होते. परत एकदा तो माणूस तिच्या जवळ आला आणि म्हणाला,

“म्याडम, इथून जाण्याची काही सोय व्हयील असं  काई वाटत न्हाई, आमी इथून पायी पण जाऊ पण तुमाला ते झेपणार न्हाई, आणि तुमाला इथ सोडून पण कसं  जाणार आमच्या गावाचं  पाव्हणं न्हव् तुमि… त्याबगर तुमि बोलावा कुणाला तरी फोन करून तवर थांबतो आमी आणि मग तुमि गेल्या की आमी बी जाऊ.”

शर्वरी ऐकतच राहिली, ज्या माणसाची तिला एव्हडी भीती वाटत होती तोच तिची किती काळजी करत होता. ती थोडं हसली त्याच्या कडे पाहून आणि तिने ड्राइवर कडे पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावर पण थोडे काळजी युक्त भाव जाणवले तिला… उगाचच…चांगला विचार केला की माणसाला अख्खं जगच चांगलं दिसतं नाही तर सगळंच वाईट, बरोबर आहे जसा चष्मा लाऊ तसच जग दिसतं. ती हा विचार करतेच आहे तितक्यात तिचा फोन वाजला, सौरभच होता. कुठल्यातरी मीटिंग मधे अटकल्यामुळे त्याला तिचा फोन रिसीव करता आला नव्हता. तिने परिस्थिती सांगताच तिला तिथेच थांबायला सांगून तो लगेच निघाला तिला घ्यायला….

फोन ठेवून ती त्या मागच्या माणसाकडे वळली आणि त्याचे आभार मानून तिला घ्यायला तिचा माणूस येत असल्याचे सांगितले. साधारण अर्ध्या पाऊन  तासात सौरभ आला, त्यानेही त्या माणसाचे आभार मानले आणि ती सौराभच्या गाडीवर मागे बसली, माघापासुनाचा ताण आता कुठल्या कुठे पळून गेला होता,  निर्धास्त होऊन ती दोघं त्या रानातून निघाली, त्या संध्येचा आस्वाद घेत, प्रेमाच्या गुजगोष्टी करत….

Advertisements

पहिल्या नोंदीच्या निमित्याने …

हो नाही करता करता एकदाची ब्लोगची सुरुवात झाली… आपल्याला जमेल का??? काय काय लिहिता येईल??? कोणी वाचेल का??? ह्यावर बराच विचार करूनही हाती काहीच गवसले नाही आणि शेवटी ठरवले कि सुरुवात तर करावी पुढे ते घोडं दामटलं जाईलच…..

लहानपणापासूनच लिहायची हौस होती पण ती हौस फक्त दहावीपर्यंत निबंध लिहिण्यापुरातीच मर्यादित राहिली. आता अनपेक्षितपणे ब्लोगचे विश्व सापडले आणि ह्या हौसेला थोडा फार का होईना पूर्ण करण्यासाठी ब्लोग लिहिण्याचा निर्णय घेतला. तसा तो घेऊन बरेच दिवस झाले पण वर दिलेल्या कारणांमुळे तो पुढे पुढे ढकलला गेला आणि अचानक वळवाचा पाऊस पडावा तसं काही कळायच्या आत wordpress ला sign up करून ब्लोग चालू केला…. एकदाचा घोडं गंगेत न्हालं…. 🙂

आता सुरुवात झालीच आहे तर हि पहिली पोस्ट….. 🙂