एखादा दिवस…

एखादा दिवस असतो असाच.. कंटाळवाणा… आळसावलेला……काही कारण नसतं तरीही उगाचच कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा, उदासवाणा वाटतो. काय बरं कारण असावं ह्याच्या मागे. नीट झोप झालेली नसणे, भूक लागलेली असणे, एखादी छोटीशी गोष्ट मनासारखी न होणे ज्यामुळे actually  कोणालाच काहीही फरक पडणार नसतो, कोणाला कशाला स्वतःला पण काहीच नाही. पण तरीही आपल्यालाच उदास वाटतं.

आणि मग एकदा का असा उदासवाणा दिवस चालू झाला की सगळंच उलट व्हायला लागतं. काही ना काही बिघडत जातं. सकाळी काम करायचा कंटाळा येतो, भाजी बिघडते, पोरगा पण सकाळी उठल्या उठल्या किरकिर करायला लागतो, घरून निघायला उशीर होतो, गाडी ट्रॅफिक मधे अडकते, ऑफीस मधे छोटंसं काम करताना पण चुका होतात, त्या निस्तरता निस्तरता दिवस जातो, एक ना दोन एकंदरच दिवस खराब जातो.

आणि अश्या दिवशी प्रयत्न करूनही चांगलं काहीच होत नाही, हातून घडत नाही.

पण आजच्या खराब दिवसातच उद्याचा चांगला दिवस लपलेला नसतो का? दुःखानंतर सुख, उन्हानंतर सावली, तसंच खराब दिवसानंतर चांगला दिवस, असंच काहीसं  असेल नक्की. त्याशिवाय आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. रोजच्या रुटीनचा कंटाळा आला म्हणून आपण दोन-चार दिवस कुठे तरी फिरायला बाहेर पडतो आणि पाचव्याच दिवशी आपल्याला त्याही गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. रोजचं रुटीनच बरं वाटायला लागतं. कधी एकदा घरी जाऊन त्यात अटकतो असं होतं. म्हणूनच आयुष्यात चांगल्या गोष्टींना वाईट गोष्टींची संगत हवीच असते. जीवनात नुसतं  गोडाला अर्थ नाही, मीठ मिरचीची फोडणी असल्याशिवाय आयुष्याला चव नाही.

आयुष्यही असंच असतं, सुख दुःखाचा पाठ शिवणीचा खेळ खेळणारं. पण मग काही लोकांच्या वाट्याला दुःखच का येतं नुसतं की सुखावरचा विश्वासच उडून जावा. अशीच लोकं  मग नास्तिक होतात का? कुणाच्या वाट्याला सुखच सुख असतं. पण सुख म्हणजे तरी काय. पैसा म्हणजे सुख का? की प्रत्येक गोष्ट मनासारखी होणे हे सुख? सुख हे पण शेवटी मानण्यावरच असतं, माणसाच्या मनावरच असतं. मग समाधान म्हणजे सुख का? मग समाधान तरी कोणत्या गोष्टीतून मिळतं? दुसऱ्यासाठी केलेल्या गोष्टीतुनही आपल्याला समाधान मिळतं. पण ती प्रत्येकच गोष्ट काही आपल्या मनासारखी नसते, बरेचदा तडजोड असते, कर्तव्य असतं, आणि ते पूर्ण केल्याचं समाधान पण असतं पण ते सुख निश्चितच नसतं.

मग सुख आहे तरी काय? कुठे मिळतं, कसं असतं, सगळ्यांसाठी सारखंच का नसतं? एकसाठी असणारं सुख दुसऱ्यासाठी  दुःखही असू शकतं. मग सुखाला आपल्याला शब्दात नाहीच बांधता येणार, ते असंच आहे चंचल, निष्पाप, खेळकर लहान बाळासारखं…एका जागी स्थिर नसणारं.

खरंच लहानपणीच माणूस सगळ्यात सुखी असतो. कुठलीही काळजी नाही चिंता नाही, अपेक्षा नाही आणि म्हणून अपेक्षाभंगाच दुःखही नाही. माणूस जसजसा मोठा होतो तश्या त्याच्या अपेक्षा वाढतात, काही पूर्ण होतात काही तश्याच राहतात आणि त्यातूनच मग अपेक्षाभंगाच दुःख येतं. मग अपेक्षा पूर्ण झाल्या तर सुख आणि नाही झाल्या तर दुःख असं असतं का? पण हे जर आपण खरं मानलं तर कधी कधी असंही होतं की कुठलीही अपेक्षा पूर्ण होण्याआधी आपल्याला वाटतो तितका आनंद ती पूर्ण झाल्यावर मिळत नाही. म्हणजे प्रत्यक्षात अपेक्षा पूर्ण होण्यापेक्षा “ही इच्छा पूर्ण झाली तर…” हा विचारच जास्त आनंद देतो. म्हणजे अपेक्षा पूर्ण होण्यातच सगळा आनंद, सुख सामावलेलं आहे असंही म्हणता येणार नाही.

फारच भरकटत चालले आहेत विचार…काही पण लिहितेय मी आज, जे मनात येईल जसं वाटेल तसं. कुठल्याच गोष्टीचा कशाशी काही संबंध नाही. आजचा दिवसच असा आहे, कंटाळवाणा… आळसावलेला…. पांघरुणातून डोकावून पहात  पुन्हा डोक्यावर पांघरूण ओढून झोपी जाणारा…..

Advertisements

निकाल

काल दहावीचा निकाल लागला, तसा हा महिना निकालांचाच महिना, पहिले बारावी मग CET आणि आता दहावी. सतत कुठला ना कुठला निकाल लागतोय. आपला निकाल मात्र केव्हाच लागलाय, दहावी काय नि बारावी काय ते डोंगर केव्हाच मागे पडलेय, सध्या आयुष्याची गाडी सरळसोट मार्गावरून धावतेय. रोजचा दिवस सारखाच… विशेष असं काहीच नाही. सकाळी उठून आवरून ऑफीस गाठणे, ऑफीस मधली कामं  उरकने, परत सगळं पटापट आवरून घर गाठणे आणि रात्रीचा सगळं आवरून निद्राधीन होणे. किती तरी दिवस झले हे असंच रुटीन चाललंय, शनिवार, रविवार त्याला जरा अपवाद आहेत पण तेही थोड्या फार फरकाने सगळे सारखेच. त्यांचं पण एक ठराविक रुटीन आहेच अमावसे पोर्णीमेसारखं…

बारावीचा निकाल मात्र आयुष्याची दिशा ठरवणारा असतो… घडवणार की बिघडवणार हे तुमच्या हाती… माझा निकाल होता तो दिवस मला चांगलाच आठवतोय, त्यावेळी आम्ही धुळ्याला होतो आणि नेमका निकाल जाहीर होणार त्या दिवशी सप्तशृंगी देवी, त्र्यंबकेश्वर असं फिरायला गेलो होतो. बारावीचा निकाल, त्याचा सीरीयसनेस असं काहीच वाटत नव्हतं. बरेच दिवसांनी भेटलेल्या आत्येमामे भावंडासोबत, फिरण्यात, हुंदडण्यात, मजा करण्यात निकालाचं काही tension वाटत नव्हतं आणि आता सारखी जीवघेणी स्पर्धा पण नव्हती. म्हणजे अर्थातच स्पर्धा होती पण थोडे कमी मार्क्स मिळाल्याने आपल्यावर डोंगर कोसळेल ही भावना निश्चितच नव्हती. आता जर ६०% च्या कमी मार्क्स मिळाले तर पुढे जॉब साठी elligible नाही होता येणार हे ठाऊकही नव्हतं. आणि त्यामुळेच त्याची पर्वाही नव्हती. फक्त चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे इतकंच माहीत होतं……………

तर सगळी देवदर्शनं करून, मौज मजा करून रात्री परत यायला एक वाजला त्यामुळे निकाल लागून गेला तरी मला माझ्या निकालाचा पत्ताच नव्हता आणि तेव्हा इंटरनेट वर आतासारखा निकाल जाहीर होत नसल्यामुळे तसाही बघता येत नव्हता. पास तर नक्कीच होईल अशी खात्री होती पण थोडी धास्ती होतीच. रात्री निद्रादेवीची आराधना करताना धास्ती अजूनच वाढली. जसजशी रात्र वाढु लागली विचारही वाढु लागले. बोर्डाचे पेपर आठवायला लागले. आपण काही लिहिलंय की नाही असंही वाटायला लागलं. अरे जीवशास्त्र, हो जीवशास्त्राचं तर आपण काही लिहिलंच नाही. जे सुचेल ते, जे मनाला भावेल ते टाकलंय फक्त. वेगवेगळ्या diseases चे syndrome हे तर आपण कधी वाचलेही नव्हते तरी लिहून आलोय आपण. काय लिहिलंय नक्की!!!!!!!!! काही तरी खरडलंय हे तर खरं…नक्कीच चुकलं असेल ते… आता काही आपलं खरं नाही, आपण नक्कीच नापास होणार. निदान जीवशास्त्र तरी नक्कीच आपला जीव घेणार.  काय वाटेल आई बाबांना आपल्याविषयी, काय दिवे लावले पोरीने. कॉलेज मधल्या मैत्रिणी कश्या बघतील आपल्याकडे!!!!!! आपलं काही खरं नाही….चढत्या रात्रीबरोबर अश्या प्रकारचे विचारही चढू लागले!!!!!!!!!! सकाळी उठेपर्यंत तर आपण नापसाच होणार, जीवशास्त्र नक्की राहणार ह्यावर माझं शिक्का मोर्तब झालं… मनाशीच….

दुसरा दिवस रविवार, कॉलेज बंद, आताशा तर पेपरातही निकाल येत नव्हता. आली का परत पंचाईत. आता काय करावं!!!!!!!!!! शेवटी म्हटलं मैत्रिनीकडे जाऊन बघू या काय करता येईल ते, तिलाच विचारू, काही तरी मार्ग निघेल. गाडी स्टार्ट  केली,  तडक मैत्रिणीचं  घर गाठलं.  नशीब ती तरी घरी होती… ती म्हणाली तिला ६४ का ६५% मार्क मिळाले. म्हटलं माझे बघितले का??? ती म्हणाली रोल नंबर कुठे सांगितला होता तू .. 😦 मनात म्हटलं बरंच झालं उगाच भलते सलते मार्क हिला कळायचे!!!!!!!  मग तीच म्हणाली चल कॉलेज ला जाऊन बघू. पण आज तर रविवार कॉलेज कुठे उघडतंय…. तरी तिच्या म्हणण्याप्रमाणे निघालो दोघी…

मेन गेट तरी उघडं होतं. गाडी पार्क केली आणि ऑफीस मधे घुसलो. काही लोकं होते आत admin वाले. एका काकांजवळ गेलो आणि म्हटलं की रिज़ल्ट पाहायचाय. त्यानी असं बघितलं न माझ्याकडे की काय मुलगी आहे काल रिज़ल्ट लागला आणि ह्या बाईला अजून काही पत्ता नाही. दुसऱ्या टेबलाकडे बोट दाखवत म्हणाले तिकडे बघा त्या डेस्क वर बघायला मिळेल.

तिकडे गेलो तिथल्या काकांना विचारलं. ते म्हणाले रोल नंबर सांगा. नंबर तर सांगितला पण गोळाच आला पोटात म्हटलं आता ह्या लोकांसमोर निकाल बघायचा म्हणजे ह्यानाही कळेल आणि काही कमी जास्त असेल तर उगाच ह्यांनाच  आधी कळेल. त्यांनी त्या sheet वरुन बोट फिरवत एक एक रोल नंबर चेक करत एकदाचा माझा नंबर मिळवला. त्यासमोरच्या लाईन वरुन बघत बघत शेवटी टोटल बघितली आणि मी डोळे फाडून बघतच राहिले…….. चक्क ८५% ….. 🙂 🙂 🙂 ……. माझा तर आनंदच गगणात मावेनासा झाला …. 😀 खरंच का माझे मार्क!!!!!!!!!!!!! विश्वासच बसेना…….. मैत्रिनिला म्हटला चिमटा काढ मला…. 😛 … आणि जीवशास्त्रात ८६  मार्क्स आउट ऑफ १०० !!!!!!!!!!!!!!!! 🙂 🙂 🙂

पवनी…

पवनी, एक छोटंसं गाव, भंडारा जिल्ह्यातलं, माझं आजोळ.. बाबांकडच…एक भावनिक नातं निर्माण झालेलं गाव. निव्वळ आजी, आजोबा असतात त्या गावात म्हणूनच नव्हे पण असं  काही तरी खास आहे त्या गावात, जे फार जवळच वाटतं.

भंडारा जिल्ह्यात असलेला हा एक तालुका, भंडाऱ्या पासून  ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात. रस्त्याच्या एका बाजूला हे दृश्य दिसतं तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका तलावात कमळाची फुलं फुललेली दिसतात.

पवनी हे गाव विशेषतः प्रसिद्ध आहे ते इथे असलेल्या देवळांसाठी.  इथे जवळपास १५० मंदीरं आहेत. त्यापैकी विशेष प्रसिद्ध अशी देवळं म्हणजे दत्त मंदिर, विठ्ठल रुकमाईचे मंदिर, मुरलीधर मंदिर, निलकंठेश्वर, वैजेश्वर, चंडकाई आणि पंचमुखी गणेश मंदिर. पवनीच्या देवळांमधील एक विशेष गोष्ट म्हणजे इथे असलेले गरुड खांब. जवळ जवळ पाच ते सहा गरूड खांब अजूनही चांगल्या स्थितीत आहेत आणि ते दगडातील कलाकृतीचा उत्तम नमुना आहेत.

नवरात्रीचा उत्सव इथे विशेष उत्साहात साजरा होतो, चंडकाई देवळाजवळ दसऱ्याच्या वेळी जत्रा भरते. गावातून मोठी मिरवणूक निघते. त्यामध्ये राम, सीता, रावणाच्या वेशात मुलं असतात. दसऱ्याप्रमाणेच कार्तिकी पौर्णिमेला मुरलीधराच्या देवळात विशेष कार्यक्रम असतो. ह्याच दिवशी वैनगंगेत रात्री दिवे सोडण्यात येतात. रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्यावर हिंदोळनारे छोटे छोटे असंख्य दिवे म्हणजे आकाशातुन जमिनीवर आलेल्या ताराकांप्रमानेच भासतात .

पोळाही इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मोठ्या माणसांचा बैल पोळा तर लहान मुलांचा तान्हा पोळा असतो. तान्ह्या पोळ्याला लहान लहान मुलं मारुतीच्या मंदिरात आपापले लाकडी बैल सजवून आणतात आणि आरती, प्रसाद झाला की सगळ्यात सुंदर सजवलेल्या बैलाला बक्षीस मिळून पोळा फुटतो. नंतर मग ही मुले घरोघरी बैल घेऊन जाऊन बोजरा मागतात, लहानपणी मी पण असा बोजरा मागायला जायचे… 🙂  सगळे मिळून दहा रुपये जमले तरी तेव्हा खूप वाटायचे. काही घरी चोकॅलेट गोळ्या पण मिळायच्या….

वैनगंगेच्या काठावर अजूनही बरेचसे आंघोळिसाठी बनवलेले घाट पाहायला मिळतात. त्यापैकी काही घाट जसे दिवाण घाट, घोडे घाट, वज्रेश्वत घाट, हत्ती घाट चांगले आहेत. घोडे घाटावर घोड्याना आंघोळिसाठी, पाणी पिण्यासाठी जुन्या काळी आणत असत असे म्हणतात, त्यावरून तो घोडे घाट. हा घाट सोडल्यास बाकी घाट दगडी बांधकाम करून बांधण्यात आले आहेत. हे सगळे घाट नदीच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हात पाय पसरलेली, नदीच्या काठावर पहुडलेली पांढरीशुभ्र  वाळू आहे.  इथे पाहायला मिळणारी अशी शुभ्र वाळू सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. नदीवर असणारा मोठा पूल आणि पुलाच्या पलीकडे वळसा घेऊन येताना दिसणारी नदी, तिथे असणारा एक मोठा दगड हत्तीच्या आकारचा असल्यामुळे हत्तीगोटा म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात नदीच्या काठावर टरबूज, डांगराच्या वाड्या दिसतात. लहान असताना आम्ही संध्याकाळी ह्या वाड्यांमध्ये टरबूज, डांगर खायला जायचो, रेतीत बसून ताजा ताजा टरबूज तोडून कापून खाण्यात पण मस्त मजा होती…. 🙂

वैनगंगा नदी

वैनगंगा नदी

नदीच्या त्या बाजूला बौद्ध स्तूप बांधण्यात आला आहे. तो स्तूप पण प्रेक्षणीय आहे. सध्या नदीवर गोसे धरण बांधण्याचे काम चालू आहे. सगळे मिळून जवळ जवळ गावात चार ते पाच तलाव आहेत. कधी ना कधी प्रत्येक तलावावर चक्कर मारली आहे. अनेक मंदिरे पालथी घातली आहेत.

गावाच्या आजूबाजूने शेतातून भटकताना अनेकदा तिथली सीताफळं चोरून खाण्याचा पराक्रम आम्ही, मी आणि माझ्या भावंडानी केला आहे… पडलेल्या, नुसते अवशेष शिल्लक असलेल्या एखाद्या बुरुजावर आम्ही अनेकदा खेळलो आहे, किल्ल्याची सफर केली आहे, नदीत मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला आहे, इथे असलेल्या छोट्या बाजारात अनेक चकरा मारल्या आहेत, दोन रुपये तिकीट असलेल्या थिएटरात कितीतरी जुने पिक्चर पहिले आहेत… आता तिकीट वाढलंय बरं का… 🙂  ह्या गावातल्या गल्ली गल्लीतून फिरलो आहे… अश्या ह्या इटुकल्या गावातच माझे बालपण लपले आहे…

पाऊस….

ऑफीस मधे काम करत असताना बाहेरच्या दुनियेचा काही पत्ताच नसतो, आपला पीसी आणि आपण असं दोघांचंच जग असतं पण आज मात्र अचानक घु..घु.. असा आवाज यायला लागला आणि सगळेच लोकं आपापल्या जागेवरून उठून  बघू लागले.. अरे झालं  काय, कसला आवाज येतोय आणि अचानक लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं…. बघतच रहावसं वाटलं…

दिसत होती ती फक्त उडणारी धूळ, झाडांची पाने, एखादा जीव गेलेला पेपर….. थोड्याच वेळात पावसाला सुरूवात झाली आणि जे दिसत होतं ते पण दिसेनासं झालं…  आता दिसत होत्या त्या फक्त कोसळणाऱ्या धारा, गारांसारखे दिसणारे टपोरे थेंब, काही मिनिटातच रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट, झाडाची तुटलेली फांदी, रस्त्यात उभ्या असलेल्या माणसाविना असणार्‍या गाड्या,  आणि दूरवर दिसणारी पावसाने झाकलेली टेकडी….

पावसाला सुरूवात झाली… दरवर्षी नेमाने येणारा तरीही येत पर्यंत अगदी चातकासारखी वाट पाहायला लावणारा हा पाऊस… तापलेल्या उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस म्हणजे तहानलेल्या जिवाला आसरा जणू.  लहानपणी पावसात भिजण्यात जितका आनंद होतो तितकाच मोठेपणीही…. आपल्या नातवला कागदाची होडी करून दाखवून ती पाण्यात सोडताना लहान होणारे आजोबा आपले बालपणच जगत असतात… परत एकदा…. पावसात फुटबॉल खेळणाऱ्या चिखलाने माखालेल्या मुलांचाही हेवा वाटायला लावणारा हा पाऊस… बालपण तात्पुरतं का होईना परत देणारा हा पाऊस…

घरी बसून आईच्या हातची भजी खात, चहा घेत गप्पांना आलेला उत, त्यातच पावसात चिप्प भिजत येणारी एखादी बहीण किंवा भाऊ, जातानाच छत्री, रेनकोट काही नेता येत नाही का म्हणून रागवणारी तरीही सर्दी होईल म्हणून घसाघसा डोकं पुसनारी आई… आणि… गप्पात परत सामील होत खोड्या काढणारा भाऊ अथवा बहीण…. रोजच्या धावपळीत तात्पुरतं का होईना  सर्वांना एकत्र बसायला लावणारा हा पाऊस….

आधीच सुटलेला अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा, त्यात त्याची वाट पाहत उभी असलेली ती, तिला दुरून बघत तिच्या चेहऱ्यावर उडणार्‍या बटा हाताने दूर करण्याचा मोह आवरत तिला न्याहाळणारा तो… त्याला समोर बघताच  खोडकर हसू लपवत, लटके रागवारी ती… अचानक ढगाचा आवाज होताच त्याला बीलगणारी ती… त्याच्या प्रियासीचा राग घालवण्याचे सामर्थ्य असलेला हा पाऊस….

दुरावलेल्या मित्रांची अचानक झालेली फोनाफोनी, ठरलेला ट्रेकिंगचा बेत, अंगावर पाऊस झेलत एकमेकांना हात देत चढलेली चढण, रानावानातून हिंडत चिखल तुडवत गाठलेला एखादा गड, रस्त्यातल्या एखाद्या टपरिवर कितीतरी दिवसांनी घेतलेला एकत्र चहा… दुरावलेल्या मैत्रिला जवळ आणणारा हा पाऊस…

रानावानातून झुळझुळ वाहणारे झरे, एखादा लगीन घाईने कोसळणारा धबधबा, गावातावर दिसणारे दवबिंदू, धुक्याने वेढलेले पर्वताचे टोक, पाठशिवणीचा खेळ खेळत मधेच सूर्याला संधी देणारे ढग आणि सजलेल्या हिरव्या शालुने नटलेल्या धरतीला बघण्यासाठी आसुसलेला सूर्य… निसर्गाचा अत्तुत्तम आविष्कार म्हणजे पाऊस…