पवनी…

पवनी, एक छोटंसं गाव, भंडारा जिल्ह्यातलं, माझं आजोळ.. बाबांकडच…एक भावनिक नातं निर्माण झालेलं गाव. निव्वळ आजी, आजोबा असतात त्या गावात म्हणूनच नव्हे पण असं  काही तरी खास आहे त्या गावात, जे फार जवळच वाटतं.

भंडारा जिल्ह्यात असलेला हा एक तालुका, भंडाऱ्या पासून  ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात. रस्त्याच्या एका बाजूला हे दृश्य दिसतं तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका तलावात कमळाची फुलं फुललेली दिसतात.

पवनी हे गाव विशेषतः प्रसिद्ध आहे ते इथे असलेल्या देवळांसाठी.  इथे जवळपास १५० मंदीरं आहेत. त्यापैकी विशेष प्रसिद्ध अशी देवळं म्हणजे दत्त मंदिर, विठ्ठल रुकमाईचे मंदिर, मुरलीधर मंदिर, निलकंठेश्वर, वैजेश्वर, चंडकाई आणि पंचमुखी गणेश मंदिर. पवनीच्या देवळांमधील एक विशेष गोष्ट म्हणजे इथे असलेले गरुड खांब. जवळ जवळ पाच ते सहा गरूड खांब अजूनही चांगल्या स्थितीत आहेत आणि ते दगडातील कलाकृतीचा उत्तम नमुना आहेत.

नवरात्रीचा उत्सव इथे विशेष उत्साहात साजरा होतो, चंडकाई देवळाजवळ दसऱ्याच्या वेळी जत्रा भरते. गावातून मोठी मिरवणूक निघते. त्यामध्ये राम, सीता, रावणाच्या वेशात मुलं असतात. दसऱ्याप्रमाणेच कार्तिकी पौर्णिमेला मुरलीधराच्या देवळात विशेष कार्यक्रम असतो. ह्याच दिवशी वैनगंगेत रात्री दिवे सोडण्यात येतात. रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्यावर हिंदोळनारे छोटे छोटे असंख्य दिवे म्हणजे आकाशातुन जमिनीवर आलेल्या ताराकांप्रमानेच भासतात .

पोळाही इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मोठ्या माणसांचा बैल पोळा तर लहान मुलांचा तान्हा पोळा असतो. तान्ह्या पोळ्याला लहान लहान मुलं मारुतीच्या मंदिरात आपापले लाकडी बैल सजवून आणतात आणि आरती, प्रसाद झाला की सगळ्यात सुंदर सजवलेल्या बैलाला बक्षीस मिळून पोळा फुटतो. नंतर मग ही मुले घरोघरी बैल घेऊन जाऊन बोजरा मागतात, लहानपणी मी पण असा बोजरा मागायला जायचे… 🙂  सगळे मिळून दहा रुपये जमले तरी तेव्हा खूप वाटायचे. काही घरी चोकॅलेट गोळ्या पण मिळायच्या….

वैनगंगेच्या काठावर अजूनही बरेचसे आंघोळिसाठी बनवलेले घाट पाहायला मिळतात. त्यापैकी काही घाट जसे दिवाण घाट, घोडे घाट, वज्रेश्वत घाट, हत्ती घाट चांगले आहेत. घोडे घाटावर घोड्याना आंघोळिसाठी, पाणी पिण्यासाठी जुन्या काळी आणत असत असे म्हणतात, त्यावरून तो घोडे घाट. हा घाट सोडल्यास बाकी घाट दगडी बांधकाम करून बांधण्यात आले आहेत. हे सगळे घाट नदीच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हात पाय पसरलेली, नदीच्या काठावर पहुडलेली पांढरीशुभ्र  वाळू आहे.  इथे पाहायला मिळणारी अशी शुभ्र वाळू सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. नदीवर असणारा मोठा पूल आणि पुलाच्या पलीकडे वळसा घेऊन येताना दिसणारी नदी, तिथे असणारा एक मोठा दगड हत्तीच्या आकारचा असल्यामुळे हत्तीगोटा म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात नदीच्या काठावर टरबूज, डांगराच्या वाड्या दिसतात. लहान असताना आम्ही संध्याकाळी ह्या वाड्यांमध्ये टरबूज, डांगर खायला जायचो, रेतीत बसून ताजा ताजा टरबूज तोडून कापून खाण्यात पण मस्त मजा होती…. 🙂

वैनगंगा नदी

वैनगंगा नदी

नदीच्या त्या बाजूला बौद्ध स्तूप बांधण्यात आला आहे. तो स्तूप पण प्रेक्षणीय आहे. सध्या नदीवर गोसे धरण बांधण्याचे काम चालू आहे. सगळे मिळून जवळ जवळ गावात चार ते पाच तलाव आहेत. कधी ना कधी प्रत्येक तलावावर चक्कर मारली आहे. अनेक मंदिरे पालथी घातली आहेत.

गावाच्या आजूबाजूने शेतातून भटकताना अनेकदा तिथली सीताफळं चोरून खाण्याचा पराक्रम आम्ही, मी आणि माझ्या भावंडानी केला आहे… पडलेल्या, नुसते अवशेष शिल्लक असलेल्या एखाद्या बुरुजावर आम्ही अनेकदा खेळलो आहे, किल्ल्याची सफर केली आहे, नदीत मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला आहे, इथे असलेल्या छोट्या बाजारात अनेक चकरा मारल्या आहेत, दोन रुपये तिकीट असलेल्या थिएटरात कितीतरी जुने पिक्चर पहिले आहेत… आता तिकीट वाढलंय बरं का… 🙂  ह्या गावातल्या गल्ली गल्लीतून फिरलो आहे… अश्या ह्या इटुकल्या गावातच माझे बालपण लपले आहे…

Advertisements

3 प्रतिसाद

  1. छान लिहीले आहेस प्रिती….
    तु केलेले वर्णन वाचुन पवनी बघायची इच्छा होत आहे.

  2. मी सुद्धा पवनीचा राहणारा आहे. कित्येक वर्षात गेलो नाही तिथे. हे वाचून गावाची आठवण आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: