शिवथरघळ

पुण्याच्या आजूबाजूला फिरायला कुठे जायचं हा आताशा प्रश्नच असतो. एक तर बरीच ठिकाणं पाहून झाली आहेत. दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे weekend ला सगळीकडे असलेली प्रचंड गर्दी. सिंहगड, लोणावळा, खंडाळा इथे तर जत्रा भरल्यासारखी गर्दी असते आणि त्यातून परत ट्रॅफिक मधेच इतका वेळ जातो की तिथे जाणच नको वाटतं. शेवटी ह्या वेळेस आम्ही शिवथरघळ इथे वन डे पिकनिक साठी जायचं ठरवलं.

शिवथरघळ इथे रामदास स्वामिनी दासबोध लिहिला होता. वरून धबधबा आणि त्याखाली छोटीशी गुहा असे त्याचे स्वरूप आहे. हे ठिकाण पुण्यापासून अंदाजे १२० किमी दूर आहे. सातारा रोड वर भोर कडे जाणारा रस्ता पकडून पुढे महाड रोड ला लागायचं. भोर पासून साधारण ही घळ  ५७ किमी दूर आहे पण पहिले १३ किमी सोडले तर पुढे जवळपास घाटाचाच रस्ता आहे. आणि फारशी गर्दी नसल्यामुळे आपलीच गाडी राजेशाही थाटात जाते. रस्त्यात बरेच छोटे मोठे धबधबे आणि नदी सोबतीला असते.

घळीच्या आधी साधारण १०-१५ किमी आधी एक खिंड लागते, तिथले निसर्ग सौंदर्य तर अवर्णनीय. त्या वळणावरच काही चहा, भजीच्या टपऱ्या आहेत. ढगांनी वेढलेल्या ठिकाणी वरुन पडणाऱ्या भूरभूर पावसात गरमागरम भजी आणि चहाची लज्जतच न्यारी!!!!!!

इथून पुढे गेलं की महाड रस्ता सोडून उजव्या हाताला शिवथरघळ साठीचं मोठं प्रवेशद्वार दिसतं. तिथून साधारण ६ किमी आत जावं लागतं. हा रस्ता दोन्ही बाजूने हिरव्या जर्द झाडीने वेढलेला आहे. आणि खाली उतरत घळीच्या जवळ असलेया छोट्या गावात तो जातो.

ऐन पावसाळ्यात जर खूप पाऊस झाला असेल तर ह्या गुहेवरून पण पाणी पडतं आणि आत जाण्यासाठी भिजतच जावं लागतं असं इथले लोक सांगतात  मात्र आम्ही गेलो तेव्हा जास्त पाऊस नसल्यामुळे छोटासाच धबधबा होता. सध्या तरी विना गर्दीचं शांतता अनुभवण्याच हे ठिकाण आहे.

Advertisements

बोबडे बोल…

दिवस उगवताच गादीतून बाहेर निघायच्याही आधीच बडबड चालू होते, “ततापापातापया…”, स्वयंपाकखोलीत असलेल्या मला कळून चुकते की चिरंजीव उठले. तिथुनच वाकून पाहिल्यावर दिसते की चिरंजीव उठून बसून माझ्याचकडे पाहत गोड हसत आहेत… 🙂 आणि हातवारे करत बडबड चालू आहे  “पटतततया..” तितक्यात पायांकडे बघत परत बडबड चालू, “चsssssद्दी…” … :D, ” हो रे राजा तू घातलीये चड्डी” तरी तोच चsssssद्दीचाच जप पुढे चालू राहतो… 🙂

अशी बडबड करताना पण त्यामागचं लॉजिक काही कळत नाही, ‘आई’ आणि ‘भाजी’ नीट म्हणता येत असूनही कितीही सांगितलं तरी ‘आजी’ काही म्हणत नाही… 😀 आणि ‘बाबा’ म्हणता येते पण ‘आबा’ म्हणत नाही…. “मम्मी” च्या ऐवजी, “मंबी” म्हणतो…. फटका कसा फुटतोय म्हटल्यावर “ढssssण”,  विमान कसं जातंय तर “बssssम”… आणि भू भू कसा करतो तर “भू भू”… 🙂 सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द म्हणजे ‘बंssssद’…..त्याला कारणही तशीच…. मोबाइलला हात लावायचा नाही तो “बंssssद”  झाला, बाहेर जायचं नाही दार ” बंद” झालं… एक ना अनेक….

नंतर दिवस चालू झाला की मस्ती, पसारा, सतत बडबड ह्यांची काही कमतरता नसते. एकदा का स्वारी गादीतून उठून हॉलमधे आली की लागलीच किचन मधे पळते. एक एक करत सगळ्या ट्रॉल्या उघडून त्यातले भांडे बाहेर काढले जातात आणि बाजुचच कपाट उघडून आतल्या हात पुरेल त्या सगळ्या बरण्या खाली जमिनीवर लोळण घेत पडतात!!!!!!!! त्यात काचेच्या बरण्या ठेवायचा मूर्खपणा मी करून चुकले आणि एक-दोन फुटल्यावर त्यांना राम राम केला. प्लास्टिकच्या बराण्यांचाच विजय झाला… पाडा, तुडवा, फेका, परत ठेवा, परत पाडा….. शेवटी मग त्यालाच म्हणतो  “चला ट्रॉली ‘बंssssद’ झाली !!!!!!!”..

खेळण्यांची बास्केट दिसल्यावर तर घरातला पसारा बघायलाच नको!!!!!! एक एक खेळणं त्यातून बाहेर काढलं आणि थोडं उलट पलट केलं की जिकडे हात फिरेल तिकडे भिरकावलं जातं. भिरकावताना पण दुसरं पहिल्यापेक्षा पुढे कसं जाईल हे पाहणं महत्वाचं!!!!!!! ह्यामधे बिचाऱ्या हत्तीने आपली सोंड आणि दोन्ही हात गमावले….. चिमण्या स्टॅड पासून वेगळ्या निघाल्या, गाडीची चाकं निखळून पडली आणि आता डोळा आहे तो कार मधून मधेच डोकं वर काढणार्‍या व्हीडिओवाल्या  माणसावर….आम्हीच वाचवातोय बिचाऱ्याला…. 🙂

थोडा वेळ हा खेळ करून झाला की नजर जाते ती शूरॅक वर……एखादा चप्पल/बुटाचा जोड अनावधानाने बाहेर राहिलाच तर पहिले मोर्चा तिकडे वळतो. यातही हे चांगलं नाही आपल्याला हे खेळायला देत नाही, घेतलं तर आई रागावते हे माहीत असूनही मुद्दाम एकदा माझ्याकडे पाहात, मिश्किल हसत, “मी जातोय बरं का तिकडे” असा नजरेनीच इशारा देत ते उचलतो आणि मी धावली ते दूर फेकायला की स्वतःच दूर फेकत स्वारी तुरुतुरु पुढे पळते… 😀 चला हा गेला दुसरीकडे आपणही बसावं थोडा वेळ स्वस्थ….. तर परत एकदा माझ्याकडे बघत बघत पुन्हा मघाचाच खेळ सुरु होतो……. सुरवातीला ह्यात मजा वाटणारी मी ३-४ दा  असं पळून थकून जाते पण हे महाराज मात्र अजूनही त्याच उत्साहाने त्याच चपलेकडे पळतात!!!!!!!!!!! शेवटी मीच ती बाहेर असलेली चप्पल एकदाची शूरॅक मधे ठेवते…. दोनच मिनिट…. शूरॅकचं दार उघडून एक एक बूट, चप्पल बाहेर काढायला सुरूवात झालेली असते…. 🙂 आता मात्र माझी सहनशक्ती संपते, रागावत ओढत परत त्याला त्या बास्केट पाशी आणून बसवते आणि सांगते… “बंssssद” झालं  ते, आता नाही उघडत. परत मी स्वस्थ बसण्याचा अवकाश कि स्वारी स्वयंपाकघरात ट्रॉल्या रिकाम्या करण्यात मग्न झालेली असते!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आंघोळ करणे हा तर एक मोठा सोहळाच असतो. आंघोळीला जाण्याच्या घाईपाई कपडे काढण्याचाही धीर नसतो आणि एकदा का बाथरूममधे गेला की अलीबाबाच्या गुहेचं दारच उघडलं जातं. एका हातात मग्गा हवाच असतो. त्यात बदलीतलं पाणी घेतलं की अंगावर टाके पर्यंतच ते जमिनीला वाहिलेलं असतं. परत तोच मग्गा पाण्यात बुडवून अर्धी बदली रिकामी होत पर्यंत हाच खेळ चालतो. नंतर मात्र सरळ एक पाय बदलीत टाकण्यासाठी उचलतो आणि मीच शेवटी पडशील रे बाबा म्हणत त्याला एकदाचा बदलीत ठेवते!!!!!!!!!!!!!!! नंतर मग हाताने बदलीतलं असेल नसेल तेव्हड पाणी उडवत माझी पण अर्धी आंघोळ होते आणि तोंडाने सतत फुरक्या”ब्रूंब्रूंब…” काढत गाडी पण चालूच आसते. ह्यात विघ्न आणायचा मात्र अजिबात प्रयत्न करायचा नाही. तुम्ही त्याला बदलीतून काढायला हात जरी पुढे केला तरी हा अजुन अजुन खाली खाली सरकणार… 🙂 आणि तरी जर तुम्ही माघार घेतली नाही तर जणू काही पडला जोरात असा भोंगा पसरणार… 🙂 शेवटी रडत बोंबलत बाहेर काढून आंघोळ आटोपती घ्यावी लागते.

आंघोळ झाल्यावर पाळण्यात तरी आम्ही शांत झोपतो का??????  उंम्महम्म्… सततच मस्ती करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. पहिले तर जोरजोरात पाय झाडून सायकल चालवणे, एकदा का ते आटपले की विविध योगासनं आम्ही करतो  जसे पाळण्यातल्या पाळण्यात पालथे होणे (इथे झोळीचा पाळणा अभिप्रेत आहे), पाळण्यातच उठून बसणे!!!!! पाळण्याच्या जाळीतून वाकून पाहत फुरक्या वाजवत गाडी चालवणे, पाळण्याची जाळीच तोंडात पकडून बंदरा सारखी तोंडं करणे… :D, सगळ्या गोष्टीत आम्ही पटाईत….

आजी, आबांसोबत अख्ख्या सोसायटीत फिरत असल्यामुळे मीच आता, ‘अथर्वची आई’ म्हणून ओळखली जाते, त्या दिवशी एका वाढदिवसला गेली असताना एक काकू म्हणाल्या, “खूप नखरे करतो हो तुझा मुलगा, त्यामुळे खूपच famous आहे…..”!!!!!!   😀  रस्त्याने जाताना पण एखादे आजोबा आजी, कधी कॉलेज कन्यका नाही तर एखादा दादा कौतुकानी पाहतात किंवा कधी लाडहि  करतात !!!!!! 🙂 मॉलला, दुकानात गेल्यावर कोणी ना कोणी घेतंच….. गाडीवर बसून बाहेर जातानाही फुरक्या नाही तर चिवू-कावूशी गप्पा चालूच असतात…..इवली इवली पावलं “मंबी…मंबी….” करत घरभर माझ्या मागे मागे फिरतात….अश्या किती तरी छोट्या मोठ्या गोष्टी , शब्दबद्धहि करता येणार नाही असे काही प्रसंग आणि अनेक सुखाचे क्षण… असं खूप काही मिळालंय आई होण्यातून…… असे हे वाळूसारखे भरभर निसटणारे क्षण पकडायचाच  हा एक छोटासा प्रयत्न !!!!!!!

रांगोळी

रांगोळी म्हणजेच रंगांच्या ओळी. घरासमोर काढली जाणारी रांगोळी मांगल्याचे प्रतीक मानली जाते. किती तरी विविध प्रकारे रांगोळी काढता येते जसे फुले, पाने, थेंबांची रांगोळी, संस्कारभारतीची  रांगोळी.  भारतात वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीला वेगवेगळी नावे आहेत. जालावरून काही नावे मिळवली ती अशी:

पश्चिम बंगाल : अल्पना
बिहार : रिपाणा
उत्तर प्रदेश : चोव्कपुराना
राजस्थान : मदाणा
तामीळनाडू : कोलम

दसरा, दिवाळी, संक्रांत, गौरी-गणपती अश्या सणांमधे रांगोळीचे खास महत्व आहे. दिवाळीला माझ्या आजोळी आम्ही अंगणभर रांगोळ्या काढत असु, मग कोणाची रांगोळी छान अशी स्पर्धा पण चाले. त्यासाठी शोधाशोध करून छानशी design आधीच शोधून ठेवावी लागे . आता मात्रा दरासमोर एकच रांगोळी काढता येते… फ्लॅट संस्कृतीचा परिणाम … 😦 मग त्यावरच दिवे, फुले ठेवून ती सजवली जाते. अश्याच एका दिवाळीला काढलेल्या रांगोळीचा फोटो काल जुने फोटो चाळताना सापडला, तोच आज टाकत आहे: