विश्वास

संध्याकाळची ७-७:३० ची वेळ…. मी स्वयंपाक करतेय किचन मधे…. समोर माझा सव्वा वर्षाचा लेक आणि त्याचे आजी आजोबा खेळताहेत. खेळता खेळता अचानक लेकाला बॅट आठवली. ‘बॅथ… बॅथ…. ‘ लेकानी एकच जप चालू केला. आजोबा उठले….. सगळ्या खोल्यांमधे शोधून आले कुठे बॅट सापडतेय का ते शोधायला???? कुठेच नाही सापडली !!!!!!!!!!!!

आजी विचारतेय लेकाला  ‘कुठे टाकलीस तू बॅट ?’

‘बघ….. ह्या सोफ्याखाली आहे का?’

मी डोकावून पहिले एकदा हॉल मधे…. लेक पण लगेच आजीची आज्ञा शीरसावन्द्या मानून वाकला खाली बॅट शोधायला….. तरी दिसेना!!!!! शेवटी पालथा होऊन, झोपून वाकून वाकून पाहत आजीला म्हणाला
‘बॅथ आए…..’

लेकाने असं म्हणायचाच अवकाश आजीनी लगेच आजोबांना रिपोर्ट केला, “हा सांगतोय बघा… सोफ्याखाली आहे बॅट !!!!!”

आजोबा पण आले सोफ्याखाली बॅट शोधायला.

मी किचन मधून ऐकतेय हा सगळा संवाद. मला हसूच फुटले, सव्वा वर्षाचा हा पोर ह्याला दिसली असेल नसेल तरी त्याचा फक्त बॅटचा जप चालू आहे. तरी आजीला किती विश्वास त्याच्यावर….. आणि आजोबा पण लगेच सोफ्याखाली बॅट शोधायला लागले !!!!!!!!

पण लेकानी आजी आजोबांचा विश्वास सार्थ ठरवला….. आणि बॅट सापडली सोफ्याखालीच….. 🙂 🙂

Advertisements

अधिक-उणे

आज ती ऑफिसला निघाली होती आठ महिन्याच्या दीर्घ रजेनंतर… गेल्या आठ महिन्यातल्या अनेक अनुभवांनी समृद्ध झालेली….. आई झालेली. मनात घालमेल होती, पहिल्यांदाच तान्हुल्याला सोडून जाताना मनावर दडपण आले होते. सकाळपासूनच मन बेचैन होते. सकाळची बाकी कामं आटपते न आटपते तोच त्याची तेल मालिश करणारी बाई आली. तिच्याकडून त्याचं सगळं करून घेऊन, त्याला दूध पाजून झोपवून ती जायला तयार झाली. जाताना एकदा त्याच्या कडे बघितलं… निर्धास्त होऊन तो पाळण्यात झोपला होता, मधेच हसत होता… आई आजूबाजूला असल्याच्या जाणिवेनेच त्याला सुरक्षित वाटत होते… निश्चितच….तिला वाटले आता हा उठल्यार आपण नसू !!!!! गेल्या आठ महिन्यात असे प्रथमच होईल. उठल्या उठल्या मला पहायची सवय असलेल्या ह्याला माझ्या अभावी ह्या जगात पोरके वाटेल का???? त्याला मिळत असलेल्या माझ्या मायेच्या सावालीपेक्षाहि मला मिळणाऱ्या त्याच्या त्या लुसलुशीत स्पर्शाची मी खूप मोठी किंमत देतेय….. नक्कीच !!!!!!!!

आज रविवार, सुट्टीचा हक्काचा दिवस….. संपूर्ण दिवस फक्त पिल्लुचा…. त्याच्या साठीचा. पण म्हणून बाकी घरातली कामं थोडीच सुटलीय. तिला सुट्टी म्हणून बाकीच्यांच्या आरामाचा दिवस…… तिला कधी सुट्टी ????? स्वयंपाकाचं आवरता आवरताच १२ वाजले आणि पिल्लुचा आवाज आला. पाळण्यातूनच स्वारी आवाज देत होती. पटकन हात धुवून ती पळालीच जवळ जवळ त्याला घ्यायला….. त्याला घेऊन हॉल मध्ये आली आणि त्याला भूक लागली असेल म्हणून परत स्वयंपाकघरात वळली त्याचं करायला… तर…. तोच आजीकडे गेला रडत रडत भूक लागली म्हणून !!!!! ती बिचारी झाली अगदी…. डोळ्यात आलेलं पाणी लपवत असतानाच आपण काय गमावलं ह्याची जाणीव झाली तिला !!!!!!!

उद्या खूप महत्वाची मीटिंग होती तिची… Client  Visit, आणि ती लीड असल्यामुळे सगळी जबबदारी तीचीच होती. रात्री झोपतानाच सकाळी लवकर उठून आटपून लवकरच निघावे थोडे तिने ठरवलं होतं. काही कामं पण उरकायची होती. पिल्लुच्या रडण्याने रात्री जाग आली. त्याला भूक लागली असेल म्हणून तिने जवळ घेतले तर बापरे आंग चांगलंच गरम होतं… १०० च्या वर ताप होता. रात्री दिलेल्या औषधांनी तात्पुरता ताप उतरला तरी सकाळी परत चढलाच. रजा घेणं शक्यच नव्हतं. परत तीच जीवाची घालमेल….. सगळंच मन इकडे पण खांद्यावरची जबबदारी कशी झटकता येईल???? शेवटी आपल्या हृदयाच्या तुकड्याला नवरा आणि सासुच्या जबाबदारीवर सोडून ती निघाली. मी ऑफीस मधून फोन करेन डॉक्टर कडे लगेच न्या असं सांगायला विसरली नाही पण आयुष्यातून खूप मोठे काही निसटत होते, ज्याची जाणीव निश्चितच होती पण ती हतबल होती (???????????????)

आज त्याचा शाळेचा पहिला दिवस, भारंभार डोनेशन देऊन ह्या चांगल्या शाळेत अडमिशन मिळवली. शाळेचा पहिलाच दिवस म्हणून तिने खास सुट्टी घेतली. आपल्याला भुर्ररsss जायचं आहे, मी तुला  चॉकलेट देईल, तिथे तुला खेळायला छान मित्रमैत्रिणी मिळतील असं त्याला सांगत तिने त्याला तयार केलं. त्याला घेऊन शाळेत आली पण तो राहायालाच तयार नाही. ती डोळ्यासमोरून जाताच जोरजोरात रडायला सुरूवात केली. शेवटी तिला शाळा सुटेपर्यंत २-३ तास तिथेच त्याच्या सोबत थांबावं लागलं आणि त्याला घेउनच ती परत आली. पण दुसऱ्या दिवशी काय????? तिला रोज रोज सुट्टी घेणं थोडीच शक्य होतं. म्हणून मग नवरा आणि सासू गेले त्याच्या सोबत. नंतर नवरा ऑफीसला निघून जाऊन  सासू थांबली २-३ तास… असंच पुढे १५ दिवस….. आपल्याच पिल्लूच्या सहवासातले सोनेरी क्षण आपण गमावतोय का ?????

आता तिचा लेक चार वर्षाचा झाला होता. शाळेतही जायला लागला होता आणि सध्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. घरी पाहुणे होते, नंदा, जावा दिवाळीनिमित्य आल्या होत्या. दिवाळी संपून दोन चार दिवस राहायचा त्यांचा प्लान होता. पण ती गेलीच ऑफीसला दिवाळी संपताच. बांधील होतीच शेवटी ती. संध्याकाळी घरी परत आल्यावर पिल्लुला पाहताच आपले सगळे कष्ट विसरून तिने जवळ घेतले त्याला. तर तिच्या कुशीत शिरत तो म्हणाला तिला “तूच का जातेस ग आई ऑफीसला. चिनू -मनुची आई कशी घरीच असते  !!!!!!!!!!! मला कित्त्ती आठवण आली तुझी माहितेय???? ” तिला गलबलून आले. त्याला आपल्या मिठीत घेऊन ती मूकपने रडत राहिली… आणि त्यातून निसटून खेळायला जायचा तो प्रयत्न करत राहिला !!!!!!!!!!!