नि:शब्द

त्याला पाहून वेडीच झाली ती…. आजच तर पहिल्यांदा पाहिलं त्याला….. सकाळीच…. वर्गात शिरताना दरवाजातच त्याला धडकणार होती ती. पण थोडक्यात वाचली आणि का वाचली ही हळहळ तिला नंतर होत राहिली. लाल रंगाचा आडव्या लाइनिंग चा शाहरूख ने DDLJ मधे घातला होता तसला T-Shirt , तश्याच फोल्ड केलेल्या बाह्या, चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य, तिला आवडणारा ना गोरा ना काळा असा गहू वर्ण आणि आहे त्याच स्मार्टनेस मधे अजुन भर घालणारा चस्मा…. तिला स्वप्नातला राजकुमारच वाटला तो.  पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती त्याच्या…

तिच्याच वर्गात आला होता तो….  नवीनच अडमिशन  आहे हे तिला नंतर कळले.  काय बरं त्याचं नाव… हं…. प्रतीक….  असंच तर सांगितलं मैत्रिणिने.  नावही किती छान आहे, तिच्या प्रेमाचं ‘प्रतीक’… स्वतःशीच खुश झाली ती…  त्याची प्रत्येकच गोष्ट तिला छान वाटायला लागली. तिच्या मनात तो घर करून गेला.

दुसऱ्या दिवशी तर तिला कधी एकदा कॉलेजला जाते आणि कधी त्याला परत एकदा पाहते असं झालं होतं. खरंच कुणाला नुसतं पाहून, पहिल्याच भेटीत आपण प्रेमात पडू शकतो ह्यावर तिचा विश्वासच बसेना, पण असं झालं होतं खरं. आता कोणी त्याला crush म्हणो, attraction  म्हणो…. तिला पर्वा नव्हती !!!!!!!!

आजची सकाळ पण मस्त उगवली होती. तिला जाग आली तीच मुळी कोकिळेच्या आवाजानी, तिच्या खोलीच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर मस्त रिमझिम पाऊस  पडत होता, आणि अंगणातली फुलं वार्‍यवर डोलत होती. तिने तो ओला, हवाहवासा सुगंध आपल्या श्वासात भरून घेतला. तिला परत एकदा त्याची पहिली भेट आठवली. काल त्या भेटीनंतर वर्गात पण तिचं काही लक्ष नव्हतं. सर काय सांगताहेत सगळं तिच्या डोक्यावरून जात होतं आणि नजर सतत त्याच्याकडे वळत होती. मुलांच्या रांगेत तो दुसऱ्याच बेंचवर काठावर बसला होता, त्याच्या हालचाली सहज टिपता येत होत्या आणि त्या टिपायची एकही संधी ती सोडत नव्हती. त्याच्या हालचालींना पण एक प्रकारचा स्मार्टनेस होता… कि तिला तो उगीचच जाणवत होता !!!!!!!!!!!! त्याची बसायची स्टाइल, लिहायची स्टाइल, सरांनी काही विचारलं तर उत्तर देण्याची स्टाइल….”वैजू…. ए……  वैजू…… उठायचं नाही का आज!!!!!  ८ वाजत आले !!!!!” आईच्या हाकेने तिची तंद्री भंग पावली.

“कॉलेज ला जाताना दांडेकर काकूंकडे निरोप देऊन जा….. संध्याकाळी भीसी आहे म्हणावं आमच्याकडे. नक्की या… आणि तू पण लवकर ये आज कॉलेजमधून”

आईची टेप पुढे चालूच होती… तिने एक मोठ्ठा आळस दिला. ही आई पण ना…आकाशातुन सरळ जमिनीवरच आणते…… जाऊ दे…… मला पण नाहीतरी आज लवकरच जायचय कॉलेजला, त्या प्रतीकशी ओळख करायची आहे असा विचार करतच ती उठली.

आज कॉलेजची तयारी करताना पण एक वेगळाच उत्साह होता तिच्यात. आपला सगळ्यात आवडता गुलाबी रंगाचा ड्रेस घातला तिने, तिच्या गोऱ्यापान वर्णाला तो खूपच खुलून दिसत होता. आपल्या घनदाट कुरळ्या केसांना बो मध्ये एकत्र बांधले, एका हातात घड्याळ आणि एका हातात गुलाबी रंगाचंच मॅचिंग ब्रेस्लेट घातलं. कानातले पण गुलाबी रंगाचे. ती गुलाबीच होऊन गेली होती आज…. आरश्यातील आपल्या छबीकडे बघून ती स्वतःशीच लाजली….

जाताना आईने परत एकदा दांडेकर काकूंकडे जायची आठवण करून दिली.

पहिले दांडेकर ककूंकडे जायचा तिला सर्वस्वी कंटाळा आला होता. तिला आधीच कॉलेज गाठायची घाई झाली होती. पण रस्त्यातच त्यांचे घर होते आणि आईचा निरोप देणे भाग होते.

तिने काकूंच्या घरी बाहेर अंगणात गाडी लावली व त्यांना निरोप देऊन बाहेर आली, तोच तिला समोर तो रस्त्यावरून जाताना दिसला…. कॉलेजलाच चालला होता बहुतेक…. त्याला बघुनच ती शहारली… मोहरून गेली … गालावर नकळत लाली पसरली…. त्याच्याशी बोलण्याची अनावर इच्छा मनात तरळून गेली…..

पायीच चालला होता तो…. आणि ती तिच्या स्कूटीवर !!!!!!!!!! कशाला हव्यात गाड्या न घोड्या कॉलेजला जायला, आईचे वाक्य तंतोतंत पटले तिला. स्कूटी इथेच ठेऊन पायीच निघावे असही वाटून गेलं….क्षणभर….. पण मग ती त्याचे काय कारण सांगणार होती …. शेवटी नाइलाजाने तिने गाडी स्टार्ट करायला घेतली….. पण छे!!!!!!!!!! ती सुरुच होईना…… तिला गाडी सुरू न होण्याचा इतका आनंद कधीच झाला नसेल……चार पाचदा किक मारून पण काहीच फायदा झाला नाही. तितक्यात काकु बाहेर आल्या आणि तिला विचारू लागल्या, “गाडी सुरू होत नाहीए का???” तिने नाही म्हणताच त्या म्हणाल्या “थांब मी बोलावते कोणाला तरी.”

आणि…… त्यांनी चक्क रस्त्यावरून जाणार्‍या त्यालाच बोलावलं, “गाडी सुरू होत नाहीए…… बघता का जरा ????”

तिचे दांडेकर काकुंवरचे प्रेम उफाळून आले….  त्यांनाच मिठीत घ्यायची इच्छा झाली तिला. मनातला आनंद चेहऱ्यावर दिसू न देता तिने एकदा त्याच्याकडे पाहिले… तो पण धीटपणे तिच्याचकडे बघत होता, त्या छोट्या गावात मुलं मान  वर करून पण मुलींकडे पहात नसताना त्याच्या नजरेतली धिटाई तिला आवडून गेली……

तो आला … जवळ…. अगदी जवळ….. तिच्या पासून फार तर हातभर अंतरावर उभा होता तो. तिने बघितले त्याच्याकडे….. पण तिला बोलायला काही सुचलेच नाही. ती फक्त बघतच राहिली, शेवटी तोच म्हणाला, “मी बघू का सुरू करून???”

त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर येत केविलवाणे हसत तिने गाडीच्या हॅंडल वरचा हात काढला आणि त्याने ते हॅंडल पकडले, हे करताना झालेला हाताचा ओझरता स्पर्श तिच्या अंगभर मोरपीस फिरवून गेला….. इतक्या जवळून त्याला दुसर्यांदा बघताना, त्याच्या इतक्या जवळ उभे असताना तिला खूप छान वाटत होते…. हे क्षण संपूच नये …… असे तिला न वाटले तर नवलच !!!!!!!!!!!!

त्याने पण दोन-चार किका मारल्या तरी गाडी चालू व्हायचे नाव घेईना… थोडा वेळ प्रयत्न करून तो म्हणाला “इथे जवळच एक गेरेज आहे. तिथपर्यंत ढकलत घेऊन जाऊ आणि त्यालाच चालू करून मागू ???? “. तिचा होकार गृहीत धरूनच त्याने गाडी ढकलायला सुरूवात पण केली. तिला खरतर म्हणायचे होते,  “नको नेईन मी, तुम्हाला कशाला उगाच त्रास!!!!!”  पण काही न बोलताच ती त्याच्या मागोमाग चालू लागली.

कोणीच कोणासोबत बोलेना. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला तिला, “तुम्ही S. R. S. College मधे सेकंड इयर लाच शिकता नं? ” तिने मानेनेच होकार दिला. “मी बघितलं काल तुम्हाला….” तोच पुढे म्हणाला.

“तू  म्हटलं तरी चालेल. आपण एकाच वर्गात आहोत ” ती कशीबशी म्हणाली. तो मंद हसला फक्त आणि म्हणाला,

“मला काही नोट्स हव्या होत्या. मी थोडी उशीरच अडमिशन   घेतलीय”

ती हो म्हणणारच तोच समोरून येणाऱ्या एका मुलीकडे बघून तो हसून  “hi …” म्हणाला .

त्या मुलीच्या डोळ्यात बघत खूप प्रेमाने विचारलं त्याने “कशी आहेस?”

ती पण त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली “कशी असणार तुझ्याशिवाय !!!!!! कित्ती दिवस लावले इथे यायला” तो फक्त हसला…आणि त्या दोघींची ओळख करून देत म्हणाला, “प्रणाली , ही….” आणि त्याच्या लक्षात आले की आपण नावच विचारले नाही हिला….. त्याने प्रश्नार्थक  नजरेने वैजुकडे पहिले…… कसनुसं हसत ती म्हणाली….”वैजू….”

“हं… वैजू !!!!!  आम्ही दोघं एकाच वर्गात आहोत. आताच ओळख झाली आमची. आणि वैजू ही प्रणाली… माझी मैत्रीण…. अगदी जीवभावाची मैत्रीण !!!!!! आधी आम्ही एकाच कॉलेजला होतो. मग हिच्या वडिलांची बदली इथे झाली म्हणून मग मी पण इथे अडमिशन ट्रान्स्फर करून घेतली…..” तो पुढे बोलतच होता……..

मात्र तिच्या कानात काही शिरत नव्हते….. उगाच पापण्यांची उघडझाप करत डोळ्यात आलेले पाणी परतवण्याचा ती प्रयत्न करत होती….. कळी उमलायच्या आधीच मिटून गेली होती…… तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यापासून दूर दूर चालला होता…… तिचे प्रेम व्यक्त व्हायच्या आधीच नि:शब्द झाले  होते………

Advertisements

10 प्रतिसाद

 1. काय ग कथाच आहे ना कि.. 🙂
  असो, मिळेल वैजुला लवकरच तिचा राजकुमार पण तेव्हाही ती ’नि:शब्द’ च असेल….

 2. गलतीसे मिस्टीक हो गया… 😀
  तरीही हा राजकुमार मिळायच्या आधीची तर नाही ना ही कथा… 🙂

 3. छे, काय हे प्रिती??
  अपेक्षा भंग केला तुम्ही… बिचार्या वैजुचा…. आनी माझाही.

 4. waiting for new post……… ! khoop ushir zalay …:)

  • :)…. पहिल्यांदा कोणीतरी अशी comment दिलीय …… आपल्या पोस्टची कोणी वाट पहातंय ह्याचा खरंच खूप आनंद झाला…. आपण जरा बरं लिहितोय ह्याची छोटीशी पावती मिळाली… 😀
   पुढची पोस्ट लवकरच टाकेन… 🙂

 5. khupach chan aahe
  pudhe kay honar yachi utkantha lagun rahte
  pan shevat aankhi changla karta aala asata…….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: