माझे खादाडीचे प्रयोग !!!!

नवीन नवीन लग्न झाल्यावर नव्या नवरीची कसोटी लागते ती पहिल्यांदा स्वयंपाक करताना……. आणि लग्नानंतरच पहिल्यांदाच स्वयंपाकघरात शिरलेल्या माझ्या सारख्यांची तर पार तारांबळ उडते !!!!!! माझ्या बाबतीत मात्र ह्याची सुरुवात पार लहानपणापासूनच झाली आहे. स्वयंपाक, भाज्या, धान्य ह्याच्याशी आपला काय संबंध ह्यावर शिक्कामोर्तब मी शाळेत असल्यापासून झाले आहे. साधारण दुसरीत असताना एकदा परीक्षेत प्रश्न होता  “भात कशाचा करतात?” तर मी चक्क ‘गव्हाचा !!!!!!!!!!!” असं उत्तर लिहून आले होते  … 😀

वेगवेगळ्या डाळी ओळखणे हा परत एक फार मोठा प्रश्न असतो माझ्यापुढे !!!!! अगदी आत्ता आत्ता मला सगळ्या डाळी आणि त्यांची नावं समजायला लागली!!!!!!  तरीही अजूनही कधी कधी कॅणफुजन होतंच. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साधारण दहावीत असताना एकदा स्वयंपाक करायचं  काम पडलं तेव्हा मी, माझी बहीण आणि एक आत्येबहीण असं तिघी मिळून तुरीच्या ऐवजी चक्क चण्याच्या डाळीचं वरण केलं होतं…. 😀 ……आणि सगळ्यानी ते चाविनी खाल्लं पण होतं !!!!!!

लहान असताना अजुन गोंधळात टाकणारा पदार्थ म्हणजे पालेभाज्या ओळखणे !!!!! मला आधी सगळ्या पालेभाज्या सारख्याच दिसायच्या….. एकदा आईनी पालक आणायला सांगितला तर मी शेपुची भाजी घेऊन आली होती…. 😀

तर असे भाज्यांचे, डाळींचे अगम्य ध्यान असलेल्या माझ्यासारखीला लग्नानंतर जेव्हा प्रथमच सगळा स्वयंपाक करायची जबाबदारी पडली तेव्हा तारांबळ न उडाली तरच नवल !!!!!! बाकी स्वयंपाक बर्‍यापैकी करता येत असताना पहिल्या दिवाळीला सगळ्यात कठीण पदार्थ करायला घेतला…. अनरसे 😐 !!!!!! भल्या भल्या सुग्रणिना वाटेला लावणारा हा पदार्थ ….. त्याच्या समोर माझा काय टिकाव लागणार !!!!!!

तर दिवाळीला आईकडे गेली असताना तिने मला त्याचे तयार पीठ दिले. ते तिनेच तयार केले होते हे वेगळे सांगायला नको, आणि सांगितले की दुधात भिजवून छान रव्यावर थाप आणि नंतर तळून घे. मी म्हटलं ठीक आहे, करून तर बघू. एक दिवस नवरा ऑफीस मधे गेल्यावर ते पीठ बाहेर काढले आणि ठरवले की ऑफीस मधून आल्यावर त्याला गरमा गरम अनारस्याची ट्रीट द्यायची… 🙂

थोडसं पीठ काढून ठेवून एव्हडुसं पीठ मी परातीत घेतलं… छान त्या पिठाच आळ बनवलं… आणि त्या आळ्यात मावेल तेव्हड दूध त्यात ओतलं !!!!!!!!!!! आणि मनात एकदम खुश झाली कि  ….. माझे अनरसे बघा कसे मस्त होतील… नाही तर कुणी पाणी पण टाकत असेल कुणाला माहीत, मी तर मस्त भरपूर दूध घातलंय… 😛

पण ह्या दुधानेच दगा दिला…. 😦 दूध झालं जास्त आणि पिठ झालं कमी…. म्हणून मग उरलेलं पीठ पण थोडं थोडं करत त्यात घातलं …. तरी ते पीठ काही दाद देईना…. ते खूपच आसट झालं….. शेवटी कसबसं थोडं घट्ट होताच त्याचे अनरसे थापायला घेतले….. होते नव्हते ते सगळे कौशल्य पणाला लावले……. अगदी गोल नाही पण त्याच्या जवळ जाणारे आकार जन्मास आले !!!!!!!!! खरी कसोटी लागली ते, अनरसे तळताना…  तुपात टाकल्याबरोबर ते पाण्यात रंग मिसळावा तसे विरघळत होते… 🙂 आणि काही ठिकाणी लाल काही ठिकाणी पांढरे असे होत होते. शेवटी जरा चांगले झालेले प्लेट मधे काढले आणि नवरा आल्यावर त्यला खायला दिले…  त्यानी पण ते गोड मानून खाल्ले हे वेगळं सांगायला नको… 🙂  (लग्न नवीन असल्याचा परिणाम ….. :P)

असो, तर असा अनारस्याचा कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा काही त्याच्या वाट्याला मी कधी गेली नाही, आईनी केलेले अनरसे गरमागरम खायचं काम मात्र इमान इतबारे पार पाडलं … 🙂

बरेचदा करून पण नेहमी काही ना काही होऊन फसणारा अजुन एक पदार्थ म्हणजे उपमा. कुणी म्हणेल कित्ती सोपा पदार्थ, ह्यात काही तरी बिघडण्यासारखं आहे का???? पण तरी हाही पदार्थ मला दाद देत नाही. कधी रवा कमी भाजण्यात येतो, कधी जास्त भाजला जातो, कधी पाणी जास्त होते तर कधी कमी…..  क्वचितच कधी तरी सगळंच छान होतं आणि आता आपल्याला छान उपमा करता येतो हा भ्रम परत दुसर्यांदा उपमा करताना खोटा ठरतो. आपलाच अति आत्मविश्वास आपल्यालाच भावतो…. 😦

एकदा लग्नानंतर माहेरी गेली असताना मी आणि माझी बहीण दोघीच घरी होतो…. मस्त पाऊस पडायला लागला आणि डोळ्यासमोर भजी दिसायला लागली, बहीण म्हणाली ‘मस्त भजी खायची इच्छा होतेय’…. तिला म्हटलं ‘थांब, मी करते मस्त गरमागरम !!!!’ (कित्ती विश्वास स्वतःच्या सुगरणपणावर … 😀 ) तिनेही पटापट छान भजे खायचे म्हणून डोळ्यातून पाणी काढत कांदे चिरून दिले….. नंतर कांदे, मिरच्या, बेसन, तिखट, मीठ, हळद सगळं एकत्र करून ठेवलं आणि भजे तळायला घेतले पण काय बिघडलं कुणास ठाऊक प्रत्येक भजा तेलात टाकल्यावर पसरू लागला, म्हणून परत बेसन टाकलं, दोन चार फेर काढल्यावर परत त्या पिठाला पाणी सुटून परत तेच, तेलात टाकताच ते पीठ पसरू लागलं …. परत बेसन मिक्स केलं की तिखट मिठाचं प्रमाण चुके म्हणून मग परत त्यात तिखट, मीठ टाकु लागली, पण परत एक दोन फेर होतच तेच चित्र ……. अश्या प्रकारे आम्ही तशीच भजी खाल्ली कुठे तिखट जास्त तर कुठे मीठ…. 🙂 पण भाज्यांनी काही शेवटपर्यंत दाद दिली नाही… 😀

भजी तर भजी तांदळाच्या खिरीचाही तोच ताल !!!!!!!!! प्रमाण कमी जास्त होण्याची ही काही उत्तम उदाहरणे !!!!!!!!! दोन माणासंपुरती खीर करण्यासाठी मी चक्क एक वाटी तांदूळ घेतले…. थोडे जास्तच पण कमी नाही….. 🙂 आणि व्हायचे तेच झले. कितीही दूध घातलं तरी खीर म्हणजे घट्ट गोळाच…. 😀 शेवटी ती घट्ट खीर रबडी सारखी खाण्यात धन्यता मनात आम्ही कशीबशी थोडी संपवली…. उरलेल्याचे काय केले हे विचारायला नको… 😛

असे हे विविध खादाडीचे प्रयोग अजूनही चालूच आहेत…….. ह्यातून कधी बिघडतं तर कधी खूप छान जमूनही जातं!!!!!!! कसंही जमलं तरी नवरोबा आवडीने खातात, सामिक्षकाचेही काम करतात आणि सुधारणा सांगत सोबत करुही लागतात…. 😀

ह्यावेळी सगळे बिघडलेले पदार्थ झाले ….. पुढल्या वेळी सगळे छान जमलेले पदार्थ …. नक्की…. 🙂

Advertisements