माझे खादाडीचे प्रयोग !!!!

नवीन नवीन लग्न झाल्यावर नव्या नवरीची कसोटी लागते ती पहिल्यांदा स्वयंपाक करताना……. आणि लग्नानंतरच पहिल्यांदाच स्वयंपाकघरात शिरलेल्या माझ्या सारख्यांची तर पार तारांबळ उडते !!!!!! माझ्या बाबतीत मात्र ह्याची सुरुवात पार लहानपणापासूनच झाली आहे. स्वयंपाक, भाज्या, धान्य ह्याच्याशी आपला काय संबंध ह्यावर शिक्कामोर्तब मी शाळेत असल्यापासून झाले आहे. साधारण दुसरीत असताना एकदा परीक्षेत प्रश्न होता  “भात कशाचा करतात?” तर मी चक्क ‘गव्हाचा !!!!!!!!!!!” असं उत्तर लिहून आले होते  … 😀

वेगवेगळ्या डाळी ओळखणे हा परत एक फार मोठा प्रश्न असतो माझ्यापुढे !!!!! अगदी आत्ता आत्ता मला सगळ्या डाळी आणि त्यांची नावं समजायला लागली!!!!!!  तरीही अजूनही कधी कधी कॅणफुजन होतंच. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साधारण दहावीत असताना एकदा स्वयंपाक करायचं  काम पडलं तेव्हा मी, माझी बहीण आणि एक आत्येबहीण असं तिघी मिळून तुरीच्या ऐवजी चक्क चण्याच्या डाळीचं वरण केलं होतं…. 😀 ……आणि सगळ्यानी ते चाविनी खाल्लं पण होतं !!!!!!

लहान असताना अजुन गोंधळात टाकणारा पदार्थ म्हणजे पालेभाज्या ओळखणे !!!!! मला आधी सगळ्या पालेभाज्या सारख्याच दिसायच्या….. एकदा आईनी पालक आणायला सांगितला तर मी शेपुची भाजी घेऊन आली होती…. 😀

तर असे भाज्यांचे, डाळींचे अगम्य ध्यान असलेल्या माझ्यासारखीला लग्नानंतर जेव्हा प्रथमच सगळा स्वयंपाक करायची जबाबदारी पडली तेव्हा तारांबळ न उडाली तरच नवल !!!!!! बाकी स्वयंपाक बर्‍यापैकी करता येत असताना पहिल्या दिवाळीला सगळ्यात कठीण पदार्थ करायला घेतला…. अनरसे 😐 !!!!!! भल्या भल्या सुग्रणिना वाटेला लावणारा हा पदार्थ ….. त्याच्या समोर माझा काय टिकाव लागणार !!!!!!

तर दिवाळीला आईकडे गेली असताना तिने मला त्याचे तयार पीठ दिले. ते तिनेच तयार केले होते हे वेगळे सांगायला नको, आणि सांगितले की दुधात भिजवून छान रव्यावर थाप आणि नंतर तळून घे. मी म्हटलं ठीक आहे, करून तर बघू. एक दिवस नवरा ऑफीस मधे गेल्यावर ते पीठ बाहेर काढले आणि ठरवले की ऑफीस मधून आल्यावर त्याला गरमा गरम अनारस्याची ट्रीट द्यायची… 🙂

थोडसं पीठ काढून ठेवून एव्हडुसं पीठ मी परातीत घेतलं… छान त्या पिठाच आळ बनवलं… आणि त्या आळ्यात मावेल तेव्हड दूध त्यात ओतलं !!!!!!!!!!! आणि मनात एकदम खुश झाली कि  ….. माझे अनरसे बघा कसे मस्त होतील… नाही तर कुणी पाणी पण टाकत असेल कुणाला माहीत, मी तर मस्त भरपूर दूध घातलंय… 😛

पण ह्या दुधानेच दगा दिला…. 😦 दूध झालं जास्त आणि पिठ झालं कमी…. म्हणून मग उरलेलं पीठ पण थोडं थोडं करत त्यात घातलं …. तरी ते पीठ काही दाद देईना…. ते खूपच आसट झालं….. शेवटी कसबसं थोडं घट्ट होताच त्याचे अनरसे थापायला घेतले….. होते नव्हते ते सगळे कौशल्य पणाला लावले……. अगदी गोल नाही पण त्याच्या जवळ जाणारे आकार जन्मास आले !!!!!!!!! खरी कसोटी लागली ते, अनरसे तळताना…  तुपात टाकल्याबरोबर ते पाण्यात रंग मिसळावा तसे विरघळत होते… 🙂 आणि काही ठिकाणी लाल काही ठिकाणी पांढरे असे होत होते. शेवटी जरा चांगले झालेले प्लेट मधे काढले आणि नवरा आल्यावर त्यला खायला दिले…  त्यानी पण ते गोड मानून खाल्ले हे वेगळं सांगायला नको… 🙂  (लग्न नवीन असल्याचा परिणाम ….. :P)

असो, तर असा अनारस्याचा कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा काही त्याच्या वाट्याला मी कधी गेली नाही, आईनी केलेले अनरसे गरमागरम खायचं काम मात्र इमान इतबारे पार पाडलं … 🙂

बरेचदा करून पण नेहमी काही ना काही होऊन फसणारा अजुन एक पदार्थ म्हणजे उपमा. कुणी म्हणेल कित्ती सोपा पदार्थ, ह्यात काही तरी बिघडण्यासारखं आहे का???? पण तरी हाही पदार्थ मला दाद देत नाही. कधी रवा कमी भाजण्यात येतो, कधी जास्त भाजला जातो, कधी पाणी जास्त होते तर कधी कमी…..  क्वचितच कधी तरी सगळंच छान होतं आणि आता आपल्याला छान उपमा करता येतो हा भ्रम परत दुसर्यांदा उपमा करताना खोटा ठरतो. आपलाच अति आत्मविश्वास आपल्यालाच भावतो…. 😦

एकदा लग्नानंतर माहेरी गेली असताना मी आणि माझी बहीण दोघीच घरी होतो…. मस्त पाऊस पडायला लागला आणि डोळ्यासमोर भजी दिसायला लागली, बहीण म्हणाली ‘मस्त भजी खायची इच्छा होतेय’…. तिला म्हटलं ‘थांब, मी करते मस्त गरमागरम !!!!’ (कित्ती विश्वास स्वतःच्या सुगरणपणावर … 😀 ) तिनेही पटापट छान भजे खायचे म्हणून डोळ्यातून पाणी काढत कांदे चिरून दिले….. नंतर कांदे, मिरच्या, बेसन, तिखट, मीठ, हळद सगळं एकत्र करून ठेवलं आणि भजे तळायला घेतले पण काय बिघडलं कुणास ठाऊक प्रत्येक भजा तेलात टाकल्यावर पसरू लागला, म्हणून परत बेसन टाकलं, दोन चार फेर काढल्यावर परत त्या पिठाला पाणी सुटून परत तेच, तेलात टाकताच ते पीठ पसरू लागलं …. परत बेसन मिक्स केलं की तिखट मिठाचं प्रमाण चुके म्हणून मग परत त्यात तिखट, मीठ टाकु लागली, पण परत एक दोन फेर होतच तेच चित्र ……. अश्या प्रकारे आम्ही तशीच भजी खाल्ली कुठे तिखट जास्त तर कुठे मीठ…. 🙂 पण भाज्यांनी काही शेवटपर्यंत दाद दिली नाही… 😀

भजी तर भजी तांदळाच्या खिरीचाही तोच ताल !!!!!!!!! प्रमाण कमी जास्त होण्याची ही काही उत्तम उदाहरणे !!!!!!!!! दोन माणासंपुरती खीर करण्यासाठी मी चक्क एक वाटी तांदूळ घेतले…. थोडे जास्तच पण कमी नाही….. 🙂 आणि व्हायचे तेच झले. कितीही दूध घातलं तरी खीर म्हणजे घट्ट गोळाच…. 😀 शेवटी ती घट्ट खीर रबडी सारखी खाण्यात धन्यता मनात आम्ही कशीबशी थोडी संपवली…. उरलेल्याचे काय केले हे विचारायला नको… 😛

असे हे विविध खादाडीचे प्रयोग अजूनही चालूच आहेत…….. ह्यातून कधी बिघडतं तर कधी खूप छान जमूनही जातं!!!!!!! कसंही जमलं तरी नवरोबा आवडीने खातात, सामिक्षकाचेही काम करतात आणि सुधारणा सांगत सोबत करुही लागतात…. 😀

ह्यावेळी सगळे बिघडलेले पदार्थ झाले ….. पुढल्या वेळी सगळे छान जमलेले पदार्थ …. नक्की…. 🙂

Advertisements

सुखावणारी गाणी…

कधी असंच जुने, खास करून कॉलेजच्या वेळेसचे गाणे ऐकून वाटतं….. मस्त होते ते दिवस, आपले फुलपाखराचे होते, अनेक स्वप्नं होती, स्वप्नातला राजकुमार कोण हे माहित नव्हते आणि तो कोण असेल ह्यावर विचार करण्यात, त्याला imagine करण्यात पण खूप मज़ा होती….. धुंदी होती……..

आता ऑफीस मधे बसल्या बसल्याच कुणी तरी लावलेलं गाणं ऐकू येतय…

चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबरssss प्यार कर…. ओहोहोहो… प्यार करssssss

त्यावेळी हे गाणं ऐकताना पण प्रत्येक मुलगी स्वतःला मधुरी दिक्षित च्या जागी consider करत valentine च्या रात्री नक्की आपला शाहरूख भेटेल अशी आशा मनात ठेवून असते ??????

मी कॉलेज ला असताना अशीच खूप गाजलेली, वाजवून वाजवून गुळगुळीत झालेली कॅसेट म्हणजे “मोहब्बतें…” . आताही कधी त्या पिक्चरचे गाणे ऐकताना कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे वाटतात….. कॉलेजच्या ट्रीप मधे केलेली धमाल आठवते….. मैत्रिणिने ह्या पिक्चरच्या गाण्यावर केलेला डान्स आठवतो….. 🙂

नुसती हि गाणी लागली तरी किती तरी आठवणी ताज्या होतात…. 🙂

मैत्रिणीच्या रूम वर तास न् तास बसून पीसी वर बघितलेलं एकच एक गाणं म्हणजे
“रंग रंग मेरे रंग रंग मे रंग जाएगी तू रंग, संग संग मेरे संग संग मे संग आएगी संग……….”
…….एकदा ऐकून….नव्हे बघून तर बघा हे गाणं…. मस्तच….. आपल्या जोडीदाराला सतत गर्दीत बघत राहणारी ती आणि गर्दितही सतत तिला शोधणारा तो आपल्याला आपल्या साखरपुडा आणि लग्नाच्या मधल्या काळाची आठवण करून देतो…….. 🙂

अशीच आणखी काही गाणी म्हणजे DDLJ ची गाणी, “तुझे देखा तो ये जाणा सनम….. ” अगदी evergreen ………. कधीही ऐका तितकंच फ्रेश वाटतं……

रात्री धाब्यावर वगैरे बस थांबली असताना, तिथल्याच एखाद्या पानठेल्यावर कधीही न ऐकलेले न गाजलेले गाणे चालू असतात… पण ती वेळच अशी असते नं की ते गाणे पण मस्त वाटतात…. तो मौसमच तसा असतो….. हिवाळा असेल तर थंडीत आणि नसेल तरीही रात्रीच्या त्या गारव्यात ती गाणी आपल्याला छानच वाटतात

जुनी गाणी तर सदाच evergreen …. . आणि बाहेर पाऊस चालू असताना गाडीच्या खिडकीतून अंगावर तुषार घेत जुने गाणे ऐकण्याची लज्जतच काही और!!!!!!!!!! गाण्यात पूर्णपणे समरस होऊन त्याच्या शब्दांचा आस्वाद घेत गाणं ऐकलं नं की गाणं पण कळत …. खरंच ….. ते आपलं वाटायला लागतं ….

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की स्वतः लावलेल्या आवडीच्या गाण्यापेक्षा, surprisingly अचानकपणे कानावर पडलेलं आवडीचं गाणं ऐकण्यात जास्त मजा येते !!!!!!!!!! surprise माणसाला आवडतंच………कसही असलं तरी… 🙂

असंच आज surprisingly  “चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना…..” हे गाणं कानावर पडलं आणि वळवाच्या पावसासारखी ही पोस्ट तयार झाली ….. 😀

निकाल

काल दहावीचा निकाल लागला, तसा हा महिना निकालांचाच महिना, पहिले बारावी मग CET आणि आता दहावी. सतत कुठला ना कुठला निकाल लागतोय. आपला निकाल मात्र केव्हाच लागलाय, दहावी काय नि बारावी काय ते डोंगर केव्हाच मागे पडलेय, सध्या आयुष्याची गाडी सरळसोट मार्गावरून धावतेय. रोजचा दिवस सारखाच… विशेष असं काहीच नाही. सकाळी उठून आवरून ऑफीस गाठणे, ऑफीस मधली कामं  उरकने, परत सगळं पटापट आवरून घर गाठणे आणि रात्रीचा सगळं आवरून निद्राधीन होणे. किती तरी दिवस झले हे असंच रुटीन चाललंय, शनिवार, रविवार त्याला जरा अपवाद आहेत पण तेही थोड्या फार फरकाने सगळे सारखेच. त्यांचं पण एक ठराविक रुटीन आहेच अमावसे पोर्णीमेसारखं…

बारावीचा निकाल मात्र आयुष्याची दिशा ठरवणारा असतो… घडवणार की बिघडवणार हे तुमच्या हाती… माझा निकाल होता तो दिवस मला चांगलाच आठवतोय, त्यावेळी आम्ही धुळ्याला होतो आणि नेमका निकाल जाहीर होणार त्या दिवशी सप्तशृंगी देवी, त्र्यंबकेश्वर असं फिरायला गेलो होतो. बारावीचा निकाल, त्याचा सीरीयसनेस असं काहीच वाटत नव्हतं. बरेच दिवसांनी भेटलेल्या आत्येमामे भावंडासोबत, फिरण्यात, हुंदडण्यात, मजा करण्यात निकालाचं काही tension वाटत नव्हतं आणि आता सारखी जीवघेणी स्पर्धा पण नव्हती. म्हणजे अर्थातच स्पर्धा होती पण थोडे कमी मार्क्स मिळाल्याने आपल्यावर डोंगर कोसळेल ही भावना निश्चितच नव्हती. आता जर ६०% च्या कमी मार्क्स मिळाले तर पुढे जॉब साठी elligible नाही होता येणार हे ठाऊकही नव्हतं. आणि त्यामुळेच त्याची पर्वाही नव्हती. फक्त चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे इतकंच माहीत होतं……………

तर सगळी देवदर्शनं करून, मौज मजा करून रात्री परत यायला एक वाजला त्यामुळे निकाल लागून गेला तरी मला माझ्या निकालाचा पत्ताच नव्हता आणि तेव्हा इंटरनेट वर आतासारखा निकाल जाहीर होत नसल्यामुळे तसाही बघता येत नव्हता. पास तर नक्कीच होईल अशी खात्री होती पण थोडी धास्ती होतीच. रात्री निद्रादेवीची आराधना करताना धास्ती अजूनच वाढली. जसजशी रात्र वाढु लागली विचारही वाढु लागले. बोर्डाचे पेपर आठवायला लागले. आपण काही लिहिलंय की नाही असंही वाटायला लागलं. अरे जीवशास्त्र, हो जीवशास्त्राचं तर आपण काही लिहिलंच नाही. जे सुचेल ते, जे मनाला भावेल ते टाकलंय फक्त. वेगवेगळ्या diseases चे syndrome हे तर आपण कधी वाचलेही नव्हते तरी लिहून आलोय आपण. काय लिहिलंय नक्की!!!!!!!!! काही तरी खरडलंय हे तर खरं…नक्कीच चुकलं असेल ते… आता काही आपलं खरं नाही, आपण नक्कीच नापास होणार. निदान जीवशास्त्र तरी नक्कीच आपला जीव घेणार.  काय वाटेल आई बाबांना आपल्याविषयी, काय दिवे लावले पोरीने. कॉलेज मधल्या मैत्रिणी कश्या बघतील आपल्याकडे!!!!!! आपलं काही खरं नाही….चढत्या रात्रीबरोबर अश्या प्रकारचे विचारही चढू लागले!!!!!!!!!! सकाळी उठेपर्यंत तर आपण नापसाच होणार, जीवशास्त्र नक्की राहणार ह्यावर माझं शिक्का मोर्तब झालं… मनाशीच….

दुसरा दिवस रविवार, कॉलेज बंद, आताशा तर पेपरातही निकाल येत नव्हता. आली का परत पंचाईत. आता काय करावं!!!!!!!!!! शेवटी म्हटलं मैत्रिनीकडे जाऊन बघू या काय करता येईल ते, तिलाच विचारू, काही तरी मार्ग निघेल. गाडी स्टार्ट  केली,  तडक मैत्रिणीचं  घर गाठलं.  नशीब ती तरी घरी होती… ती म्हणाली तिला ६४ का ६५% मार्क मिळाले. म्हटलं माझे बघितले का??? ती म्हणाली रोल नंबर कुठे सांगितला होता तू .. 😦 मनात म्हटलं बरंच झालं उगाच भलते सलते मार्क हिला कळायचे!!!!!!!  मग तीच म्हणाली चल कॉलेज ला जाऊन बघू. पण आज तर रविवार कॉलेज कुठे उघडतंय…. तरी तिच्या म्हणण्याप्रमाणे निघालो दोघी…

मेन गेट तरी उघडं होतं. गाडी पार्क केली आणि ऑफीस मधे घुसलो. काही लोकं होते आत admin वाले. एका काकांजवळ गेलो आणि म्हटलं की रिज़ल्ट पाहायचाय. त्यानी असं बघितलं न माझ्याकडे की काय मुलगी आहे काल रिज़ल्ट लागला आणि ह्या बाईला अजून काही पत्ता नाही. दुसऱ्या टेबलाकडे बोट दाखवत म्हणाले तिकडे बघा त्या डेस्क वर बघायला मिळेल.

तिकडे गेलो तिथल्या काकांना विचारलं. ते म्हणाले रोल नंबर सांगा. नंबर तर सांगितला पण गोळाच आला पोटात म्हटलं आता ह्या लोकांसमोर निकाल बघायचा म्हणजे ह्यानाही कळेल आणि काही कमी जास्त असेल तर उगाच ह्यांनाच  आधी कळेल. त्यांनी त्या sheet वरुन बोट फिरवत एक एक रोल नंबर चेक करत एकदाचा माझा नंबर मिळवला. त्यासमोरच्या लाईन वरुन बघत बघत शेवटी टोटल बघितली आणि मी डोळे फाडून बघतच राहिले…….. चक्क ८५% ….. 🙂 🙂 🙂 ……. माझा तर आनंदच गगणात मावेनासा झाला …. 😀 खरंच का माझे मार्क!!!!!!!!!!!!! विश्वासच बसेना…….. मैत्रिनिला म्हटला चिमटा काढ मला…. 😛 … आणि जीवशास्त्रात ८६  मार्क्स आउट ऑफ १०० !!!!!!!!!!!!!!!! 🙂 🙂 🙂

पवनी…

पवनी, एक छोटंसं गाव, भंडारा जिल्ह्यातलं, माझं आजोळ.. बाबांकडच…एक भावनिक नातं निर्माण झालेलं गाव. निव्वळ आजी, आजोबा असतात त्या गावात म्हणूनच नव्हे पण असं  काही तरी खास आहे त्या गावात, जे फार जवळच वाटतं.

भंडारा जिल्ह्यात असलेला हा एक तालुका, भंडाऱ्या पासून  ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात. रस्त्याच्या एका बाजूला हे दृश्य दिसतं तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका तलावात कमळाची फुलं फुललेली दिसतात.

पवनी हे गाव विशेषतः प्रसिद्ध आहे ते इथे असलेल्या देवळांसाठी.  इथे जवळपास १५० मंदीरं आहेत. त्यापैकी विशेष प्रसिद्ध अशी देवळं म्हणजे दत्त मंदिर, विठ्ठल रुकमाईचे मंदिर, मुरलीधर मंदिर, निलकंठेश्वर, वैजेश्वर, चंडकाई आणि पंचमुखी गणेश मंदिर. पवनीच्या देवळांमधील एक विशेष गोष्ट म्हणजे इथे असलेले गरुड खांब. जवळ जवळ पाच ते सहा गरूड खांब अजूनही चांगल्या स्थितीत आहेत आणि ते दगडातील कलाकृतीचा उत्तम नमुना आहेत.

नवरात्रीचा उत्सव इथे विशेष उत्साहात साजरा होतो, चंडकाई देवळाजवळ दसऱ्याच्या वेळी जत्रा भरते. गावातून मोठी मिरवणूक निघते. त्यामध्ये राम, सीता, रावणाच्या वेशात मुलं असतात. दसऱ्याप्रमाणेच कार्तिकी पौर्णिमेला मुरलीधराच्या देवळात विशेष कार्यक्रम असतो. ह्याच दिवशी वैनगंगेत रात्री दिवे सोडण्यात येतात. रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्यावर हिंदोळनारे छोटे छोटे असंख्य दिवे म्हणजे आकाशातुन जमिनीवर आलेल्या ताराकांप्रमानेच भासतात .

पोळाही इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मोठ्या माणसांचा बैल पोळा तर लहान मुलांचा तान्हा पोळा असतो. तान्ह्या पोळ्याला लहान लहान मुलं मारुतीच्या मंदिरात आपापले लाकडी बैल सजवून आणतात आणि आरती, प्रसाद झाला की सगळ्यात सुंदर सजवलेल्या बैलाला बक्षीस मिळून पोळा फुटतो. नंतर मग ही मुले घरोघरी बैल घेऊन जाऊन बोजरा मागतात, लहानपणी मी पण असा बोजरा मागायला जायचे… 🙂  सगळे मिळून दहा रुपये जमले तरी तेव्हा खूप वाटायचे. काही घरी चोकॅलेट गोळ्या पण मिळायच्या….

वैनगंगेच्या काठावर अजूनही बरेचसे आंघोळिसाठी बनवलेले घाट पाहायला मिळतात. त्यापैकी काही घाट जसे दिवाण घाट, घोडे घाट, वज्रेश्वत घाट, हत्ती घाट चांगले आहेत. घोडे घाटावर घोड्याना आंघोळिसाठी, पाणी पिण्यासाठी जुन्या काळी आणत असत असे म्हणतात, त्यावरून तो घोडे घाट. हा घाट सोडल्यास बाकी घाट दगडी बांधकाम करून बांधण्यात आले आहेत. हे सगळे घाट नदीच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हात पाय पसरलेली, नदीच्या काठावर पहुडलेली पांढरीशुभ्र  वाळू आहे.  इथे पाहायला मिळणारी अशी शुभ्र वाळू सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. नदीवर असणारा मोठा पूल आणि पुलाच्या पलीकडे वळसा घेऊन येताना दिसणारी नदी, तिथे असणारा एक मोठा दगड हत्तीच्या आकारचा असल्यामुळे हत्तीगोटा म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात नदीच्या काठावर टरबूज, डांगराच्या वाड्या दिसतात. लहान असताना आम्ही संध्याकाळी ह्या वाड्यांमध्ये टरबूज, डांगर खायला जायचो, रेतीत बसून ताजा ताजा टरबूज तोडून कापून खाण्यात पण मस्त मजा होती…. 🙂

वैनगंगा नदी

वैनगंगा नदी

नदीच्या त्या बाजूला बौद्ध स्तूप बांधण्यात आला आहे. तो स्तूप पण प्रेक्षणीय आहे. सध्या नदीवर गोसे धरण बांधण्याचे काम चालू आहे. सगळे मिळून जवळ जवळ गावात चार ते पाच तलाव आहेत. कधी ना कधी प्रत्येक तलावावर चक्कर मारली आहे. अनेक मंदिरे पालथी घातली आहेत.

गावाच्या आजूबाजूने शेतातून भटकताना अनेकदा तिथली सीताफळं चोरून खाण्याचा पराक्रम आम्ही, मी आणि माझ्या भावंडानी केला आहे… पडलेल्या, नुसते अवशेष शिल्लक असलेल्या एखाद्या बुरुजावर आम्ही अनेकदा खेळलो आहे, किल्ल्याची सफर केली आहे, नदीत मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला आहे, इथे असलेल्या छोट्या बाजारात अनेक चकरा मारल्या आहेत, दोन रुपये तिकीट असलेल्या थिएटरात कितीतरी जुने पिक्चर पहिले आहेत… आता तिकीट वाढलंय बरं का… 🙂  ह्या गावातल्या गल्ली गल्लीतून फिरलो आहे… अश्या ह्या इटुकल्या गावातच माझे बालपण लपले आहे…