अरबांच्या देशात !!!

अरबांच्या देशाची मजाच न्यारी… इथे दिसतात सगळीकडे बुरखेवाल्या बायका आणि पांढर्या वेशातील पुरुष… बायका खरंच सुंदर असतात, बार्बी डॉल सारख्या बाहुल्या दिसतात… बुरख्याच्या आत पक्कया मॉड असतात !!!! पण बुरखा मात्र घालतात आणि संस्कृति आपली जपतात…

पांढर्या डगल्यातले पुरूष… उंचपुरे आणि राकट असतात… डोक्यावर पांढरा रुमाल नि त्यावर काळी रिंग घालतात….  खिशात फेरारीची चाबी घेऊन फिरतात आणि दोन दोन बायका पण फिरवतात… 🙂 (अर्थात लग्नाच्या !!!!)

इथे येण्याआधी खरंच प्रश्न पडला होता आपल्यालापण बाहेर पडताना खरंच बुरखा घालावा लागेल काय??? एकटीला बाहेर पडता येईल का???? पण ह्या अरबांच्या देशात तसा काही नियम नाही… एक्सपॅट्सला बुराखाच काय मिनी माइक्रोचे पण बंधन नाही !!!!

टाइम पास करायला इथे मॉलशिवाय  दुसरे साधन नाही… जे काही आहे ते सर्व मॉल आणि मोठमोठ्या  बिल्डिंग्स… पण तरी भावते ती इथली शांतता !!!! रस्त्यावर गडबड नाही गोंधळ नाही की सदा असणारा ट्रॅफिक जॅम नाही… अगदी गावात सुद्धा गाड्या ८०-१००  च्या स्पीडने धावतात मात्र स्पीड लिमिटचे बंधन अगदी काटेकोरपणे पाळतात !!!!

अरबांच्या देशात अशी आहे मजा… उन्हाळ्यात मात्र उन म्हणजे एक सजा… पाच-सहा महिने जास्त उन्हाचे सोडले तर बाकी वातावरण पण छान असते…  अगदी गुलाबी नाही तरी थंडीतही जान असते….

अरबांचा हा देश एकदा बघायला हरकत नाही… वाळवंटातून रेती तुडवत डेझर्ट सफारीची मजा घ्यायला हरकत नाही… वाळवंटातून दिसणारा सूर्यास्त समुद्रातून दिसणार्‍या सूर्यास्ता-इतकाच भावणार…. सगळीकडे रेतीच रेती का असेना पण त्यातले सौंदर्य नक्कीच  वेडावणार  !!!!!!

Advertisements

छोटीसी बात…

संध्याकाळी  नेहमीप्रमाणे  ६ :३०  च्या  बस  मध्ये  चढली … कधी नव्हे ते थोडं वेळेच्या आधी आल्यामुळे खिडकीजवळची जागा मिळाली. ह्याच खुशीत होती आणि बाजूलाही कोणी नव्हते. खाली एक मुलगी कुणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत होती आणि समोरची व्यक्ती कदाचित फोन उचलत नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा वैताग स्वच्छ दिसत होता.

इतक्यात ड्राइवर ने बस चालू केली आणि ती मुलगी त्रसलेल्या चेहर्यानेच बस मधे चढली. जागाही नेमकी माझ्याच बाजूला रिकामी होती. जागेवर स्थानापन्न होताच मघापासून लागत नसलेला ह्या बाईंचा फोन लागला.

“हं, हेलो, कुठे आहेस तू ????”  आवाज चढलेलाच होता
“…..”
“मी बसली आता ह्या बस मधे. ”
“…..”
“मला आधी नाही सांगायचं का मग…!!!! ”
“…..”

“अरे दोन मिनिटापूर्वी फोन उचलला असतास तर मी दुसऱ्या रूट ची बस नसती का पकडली!!!! आता काय फायदा??”  एव्हाना आवाज अजून वाढला होता.
“…..”
“आता सॉरी म्हणून काय फायदा!!!! माझ्या बाइक ची चावी थोडी मिळेल मला…”
फोन कट….

एकदम सगळं शांत झाल्यासारखं वाटलं मला. २-३  मिनिटं असेच शांततेत गेले… तोच मागून गाणं गुणगुणायचा आवाज ऐकू आला “सच केह रहा है दिवाना… दिल… दिल ना किसी से लगाना…” , मागे बसलेली मुलगी कानात एअर फोन टाकून जोरजोरात गाणं म्हणत होती. परत बाजूच्या पोरीचा फोन वाजला…

“बोल …”
“……”
“तू असा कसा करतोस???? एक तर मला आधी काहीच सांगितलं नाहीस…. मला कुठून कळेल मग हे सगळं ….”
“…..”
“मी जाईन पायी …”
“…..”
“मला कुणाची गरज नाही… मी जाईन पायी सांगितलं नं  ” ….. “मैने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूजा, उसिने यारो मेरा दिल तोडा… तोडा, तन्हा…. तन्हा छोsssडा…” मागची मुलगी अजुन सूर लावत होती
“…..”
“नकोsss… . मी जाईन पायी…”
“….”
“तू खरंच काही कामाचा नाही. you are useless… ”
“…..”
“मला काही नको सांगू आता.. ठेवू फोन”
“…”
“ठेवते..”

नशीब फोन तरी आपटला नाही रागाने…. माझ्या मनात येऊन गेलं. परत पाच मिनिटं असेच गेले शांततेत. खिडकीतूनही आता बरीच थंड हवा येत होती. मी खिडकी लावली. एव्हाना बाजूच्या पोरीचा राग पण थोडा शांत झालेला दिसत होता तोच फोन वाजला…

“हं …”
“….”
” जाईन मी पायी तिथून. जास्त दूर नाही माझं हॉस्टेल”
“….”
“हो खरच जाईन मी. तू काही काळजी करू नकोस…”
“….”
“हेच जर तू मला आधी सांगितलं असतं तर कशाला मी ह्या गाडीत बसले असते…”
“….”
“ह्मम्म्म, ठीक आहे”
“…”
“ठेवते मग आता फोन”

परत शांतता… मागची पोरगी पण जरा शांत झाली होती. मोबाइल मधे दुसरं गाणं शोधत होती बहुतेक. ह्या वेळी मात्र बराच वेळ झाला …. विसेक मिनिटं तरी निघून गेली…. अशीच. फोन परत वाजला…

“बोल नं..”
“….”
“नाही आता कसं येणं शक्य आहे. मी थकलीय खूप.”
“……”
“आता??  काही नाही. जेवण केलं की झोप …मस्त”
“….”
“हो जाणारेय ना”
“….”
“हो गाडीपन मस्त आहे आणि गाडीवाला  पण… 😀 ” ….. “पेहेला नशा पेहेला खुमार … नया प्यार हैं नया इंतजार…”  मागच्या मुलीचं गाणं बदललं होतं आता.

बाजुचीचा पण आवाज एकदम कमी झाला होता आता. काय बोलतेय हे मला पण ऐकू येईना.
“ओके, ठीकेय ”
“….”
“हो…नक्की.. “……. “उसने बात की कुछ ऐसे रंग से…. सपने दे गया वो हजारो रंग के…”
“….”

माझा स्टॉप आला तरी फोन वर कुजबुज चालूच होती. उतरताना एकदा बघितले तिच्याकडे…. उमलणाऱ्या कळीसारखी भासत होती ती … आणि कानावर सूर पडत होते…”पेहेला नशा, पेहेला खुमार  … नया प्यार हैंsss …. नया इंतजारsss …….”

अधिक-उणे

आज ती ऑफिसला निघाली होती आठ महिन्याच्या दीर्घ रजेनंतर… गेल्या आठ महिन्यातल्या अनेक अनुभवांनी समृद्ध झालेली….. आई झालेली. मनात घालमेल होती, पहिल्यांदाच तान्हुल्याला सोडून जाताना मनावर दडपण आले होते. सकाळपासूनच मन बेचैन होते. सकाळची बाकी कामं आटपते न आटपते तोच त्याची तेल मालिश करणारी बाई आली. तिच्याकडून त्याचं सगळं करून घेऊन, त्याला दूध पाजून झोपवून ती जायला तयार झाली. जाताना एकदा त्याच्या कडे बघितलं… निर्धास्त होऊन तो पाळण्यात झोपला होता, मधेच हसत होता… आई आजूबाजूला असल्याच्या जाणिवेनेच त्याला सुरक्षित वाटत होते… निश्चितच….तिला वाटले आता हा उठल्यार आपण नसू !!!!! गेल्या आठ महिन्यात असे प्रथमच होईल. उठल्या उठल्या मला पहायची सवय असलेल्या ह्याला माझ्या अभावी ह्या जगात पोरके वाटेल का???? त्याला मिळत असलेल्या माझ्या मायेच्या सावालीपेक्षाहि मला मिळणाऱ्या त्याच्या त्या लुसलुशीत स्पर्शाची मी खूप मोठी किंमत देतेय….. नक्कीच !!!!!!!!

आज रविवार, सुट्टीचा हक्काचा दिवस….. संपूर्ण दिवस फक्त पिल्लुचा…. त्याच्या साठीचा. पण म्हणून बाकी घरातली कामं थोडीच सुटलीय. तिला सुट्टी म्हणून बाकीच्यांच्या आरामाचा दिवस…… तिला कधी सुट्टी ????? स्वयंपाकाचं आवरता आवरताच १२ वाजले आणि पिल्लुचा आवाज आला. पाळण्यातूनच स्वारी आवाज देत होती. पटकन हात धुवून ती पळालीच जवळ जवळ त्याला घ्यायला….. त्याला घेऊन हॉल मध्ये आली आणि त्याला भूक लागली असेल म्हणून परत स्वयंपाकघरात वळली त्याचं करायला… तर…. तोच आजीकडे गेला रडत रडत भूक लागली म्हणून !!!!! ती बिचारी झाली अगदी…. डोळ्यात आलेलं पाणी लपवत असतानाच आपण काय गमावलं ह्याची जाणीव झाली तिला !!!!!!!

उद्या खूप महत्वाची मीटिंग होती तिची… Client  Visit, आणि ती लीड असल्यामुळे सगळी जबबदारी तीचीच होती. रात्री झोपतानाच सकाळी लवकर उठून आटपून लवकरच निघावे थोडे तिने ठरवलं होतं. काही कामं पण उरकायची होती. पिल्लुच्या रडण्याने रात्री जाग आली. त्याला भूक लागली असेल म्हणून तिने जवळ घेतले तर बापरे आंग चांगलंच गरम होतं… १०० च्या वर ताप होता. रात्री दिलेल्या औषधांनी तात्पुरता ताप उतरला तरी सकाळी परत चढलाच. रजा घेणं शक्यच नव्हतं. परत तीच जीवाची घालमेल….. सगळंच मन इकडे पण खांद्यावरची जबबदारी कशी झटकता येईल???? शेवटी आपल्या हृदयाच्या तुकड्याला नवरा आणि सासुच्या जबाबदारीवर सोडून ती निघाली. मी ऑफीस मधून फोन करेन डॉक्टर कडे लगेच न्या असं सांगायला विसरली नाही पण आयुष्यातून खूप मोठे काही निसटत होते, ज्याची जाणीव निश्चितच होती पण ती हतबल होती (???????????????)

आज त्याचा शाळेचा पहिला दिवस, भारंभार डोनेशन देऊन ह्या चांगल्या शाळेत अडमिशन मिळवली. शाळेचा पहिलाच दिवस म्हणून तिने खास सुट्टी घेतली. आपल्याला भुर्ररsss जायचं आहे, मी तुला  चॉकलेट देईल, तिथे तुला खेळायला छान मित्रमैत्रिणी मिळतील असं त्याला सांगत तिने त्याला तयार केलं. त्याला घेऊन शाळेत आली पण तो राहायालाच तयार नाही. ती डोळ्यासमोरून जाताच जोरजोरात रडायला सुरूवात केली. शेवटी तिला शाळा सुटेपर्यंत २-३ तास तिथेच त्याच्या सोबत थांबावं लागलं आणि त्याला घेउनच ती परत आली. पण दुसऱ्या दिवशी काय????? तिला रोज रोज सुट्टी घेणं थोडीच शक्य होतं. म्हणून मग नवरा आणि सासू गेले त्याच्या सोबत. नंतर नवरा ऑफीसला निघून जाऊन  सासू थांबली २-३ तास… असंच पुढे १५ दिवस….. आपल्याच पिल्लूच्या सहवासातले सोनेरी क्षण आपण गमावतोय का ?????

आता तिचा लेक चार वर्षाचा झाला होता. शाळेतही जायला लागला होता आणि सध्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. घरी पाहुणे होते, नंदा, जावा दिवाळीनिमित्य आल्या होत्या. दिवाळी संपून दोन चार दिवस राहायचा त्यांचा प्लान होता. पण ती गेलीच ऑफीसला दिवाळी संपताच. बांधील होतीच शेवटी ती. संध्याकाळी घरी परत आल्यावर पिल्लुला पाहताच आपले सगळे कष्ट विसरून तिने जवळ घेतले त्याला. तर तिच्या कुशीत शिरत तो म्हणाला तिला “तूच का जातेस ग आई ऑफीसला. चिनू -मनुची आई कशी घरीच असते  !!!!!!!!!!! मला कित्त्ती आठवण आली तुझी माहितेय???? ” तिला गलबलून आले. त्याला आपल्या मिठीत घेऊन ती मूकपने रडत राहिली… आणि त्यातून निसटून खेळायला जायचा तो प्रयत्न करत राहिला !!!!!!!!!!!