शिवथरघळ

पुण्याच्या आजूबाजूला फिरायला कुठे जायचं हा आताशा प्रश्नच असतो. एक तर बरीच ठिकाणं पाहून झाली आहेत. दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे weekend ला सगळीकडे असलेली प्रचंड गर्दी. सिंहगड, लोणावळा, खंडाळा इथे तर जत्रा भरल्यासारखी गर्दी असते आणि त्यातून परत ट्रॅफिक मधेच इतका वेळ जातो की तिथे जाणच नको वाटतं. शेवटी ह्या वेळेस आम्ही शिवथरघळ इथे वन डे पिकनिक साठी जायचं ठरवलं.

शिवथरघळ इथे रामदास स्वामिनी दासबोध लिहिला होता. वरून धबधबा आणि त्याखाली छोटीशी गुहा असे त्याचे स्वरूप आहे. हे ठिकाण पुण्यापासून अंदाजे १२० किमी दूर आहे. सातारा रोड वर भोर कडे जाणारा रस्ता पकडून पुढे महाड रोड ला लागायचं. भोर पासून साधारण ही घळ  ५७ किमी दूर आहे पण पहिले १३ किमी सोडले तर पुढे जवळपास घाटाचाच रस्ता आहे. आणि फारशी गर्दी नसल्यामुळे आपलीच गाडी राजेशाही थाटात जाते. रस्त्यात बरेच छोटे मोठे धबधबे आणि नदी सोबतीला असते.

घळीच्या आधी साधारण १०-१५ किमी आधी एक खिंड लागते, तिथले निसर्ग सौंदर्य तर अवर्णनीय. त्या वळणावरच काही चहा, भजीच्या टपऱ्या आहेत. ढगांनी वेढलेल्या ठिकाणी वरुन पडणाऱ्या भूरभूर पावसात गरमागरम भजी आणि चहाची लज्जतच न्यारी!!!!!!

इथून पुढे गेलं की महाड रस्ता सोडून उजव्या हाताला शिवथरघळ साठीचं मोठं प्रवेशद्वार दिसतं. तिथून साधारण ६ किमी आत जावं लागतं. हा रस्ता दोन्ही बाजूने हिरव्या जर्द झाडीने वेढलेला आहे. आणि खाली उतरत घळीच्या जवळ असलेया छोट्या गावात तो जातो.

ऐन पावसाळ्यात जर खूप पाऊस झाला असेल तर ह्या गुहेवरून पण पाणी पडतं आणि आत जाण्यासाठी भिजतच जावं लागतं असं इथले लोक सांगतात  मात्र आम्ही गेलो तेव्हा जास्त पाऊस नसल्यामुळे छोटासाच धबधबा होता. सध्या तरी विना गर्दीचं शांतता अनुभवण्याच हे ठिकाण आहे.

Advertisements

पहिल्या नोंदीच्या निमित्याने …

हो नाही करता करता एकदाची ब्लोगची सुरुवात झाली… आपल्याला जमेल का??? काय काय लिहिता येईल??? कोणी वाचेल का??? ह्यावर बराच विचार करूनही हाती काहीच गवसले नाही आणि शेवटी ठरवले कि सुरुवात तर करावी पुढे ते घोडं दामटलं जाईलच…..

लहानपणापासूनच लिहायची हौस होती पण ती हौस फक्त दहावीपर्यंत निबंध लिहिण्यापुरातीच मर्यादित राहिली. आता अनपेक्षितपणे ब्लोगचे विश्व सापडले आणि ह्या हौसेला थोडा फार का होईना पूर्ण करण्यासाठी ब्लोग लिहिण्याचा निर्णय घेतला. तसा तो घेऊन बरेच दिवस झाले पण वर दिलेल्या कारणांमुळे तो पुढे पुढे ढकलला गेला आणि अचानक वळवाचा पाऊस पडावा तसं काही कळायच्या आत wordpress ला sign up करून ब्लोग चालू केला…. एकदाचा घोडं गंगेत न्हालं…. 🙂

आता सुरुवात झालीच आहे तर हि पहिली पोस्ट….. 🙂